अभिनेत्री कंगना रणौतला भाजपाने मंडी या हिमाचल प्रदेशातील मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. भाजपाच्या पाचव्या यादीत कंगना रणौतचं नाव आलं. यानंतर तिची चर्चा झाली. मात्र सोमवारी कंगना पुन्हा चर्चेत आली. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या अकाऊंटवरुन कंगनाचा अर्धनग्न फोटो पोस्ट करण्यात आला. त्या फोटोच्या खाली अश्लील शब्दांत कॅप्शन देण्यात आली. हा फोटो नंतर डिलिट करण्यात आला. मात्र या पोस्टवरुन वाद रंगला आहे. अशात नेटकऱ्यांनीही कंगनाला खडे बोल सुनावले आहेत. उर्मिला मातोंडकरबाबत कंगना काय म्हणाली होती त्याची आठवण नेटकऱ्यांनी तिला करुन दिली आहे.
काय आहे पोस्टचं प्रकरण?
हिमाचल प्रदेशातील मंडी या ठिकाणाहून कंगनाला उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपाच्या तिकिटावर कंगना या मतदारसंघातून लढणार आहे. हाच संदर्भ घेत काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन कंगनाचा अर्धनग्न फोटो पोस्ट करण्यात आला. त्या फोटोच्या खाली वादग्रस्त ओळी लिहिण्यात आल्या. त्यावरुन कंगनाने तिखट शब्दांत सुप्रिया श्रीनेत यांना सुनावलं आहे. तसंच या प्रकरणी भाजपानेही काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. आता या प्रकरणात सुप्रिया श्रीनेत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे.
कंगना रणौतची प्रतिक्रिया काय?
एक कलाकार म्हणून माझ्या गेल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत मी सर्व प्रकारच्या महिलांच्या भूमिका केल्या आहेत. ‘क्वीन’मधील एका भोळ्या मुलीपासून ते ‘धाकड’मधील मोहक गुप्तहेरपर्यंत, ‘मणिकर्णिका’तील देवीपासून ‘चंद्रमुखी’तील राक्षसापर्यंत, ‘रज्जो’मधील वेश्येपासून ‘थलाईवी’तील क्रांतिकारक नेत्यापर्यंत. आपण आपल्या मुलींना पूर्वग्रहांच्या जोखडातून मुक्त केले पाहिजे. तसंच, वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचा अपमान करणे थांबवले पाहिजे. प्रत्येक स्त्री तिच्या सन्मानास पात्र आहे, असा पलटवार कंगनाने केला.
नेटकरी काय म्हणाले आहेत?
या सगळ्या प्रकरणानंतर नेटकऱ्यांनी उर्मिला मातोंडकरला कंगना सॉफ्ट पॉर्नस्टार म्हणाली होती त्याची आठवण करुन दिली आहे. कंगनाच्या मुलाखतीचा तो अंश लोक एक्स या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत आहेत आणि तू उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणाली होतीस त्याचं काय? असं विचारत आहेत. #उर्मिलामातोंडकर हा हॅशटॅगही नेटकऱ्यांनी ट्रेंड केला आहे. मासूम, भूत, प्यार तुने क्या किया, पिंजर, एक हसीना थी हे चित्रपट उर्मिलाच्या सशक्त अभिनयाचा पुरावा आहेत असं झीनत नावाच्या एका युजरने म्हटलं आहे. कंगना तू उर्मिलाला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणाली होतीस विसरलीस का? असाही प्रश्न एका युजरने विचारला आहे. जे आत्ता कंगनाबाबत पोस्ट केली म्हणून गळा काढत आहेत त्यांनी कंगनाचा उर्मिलाबाबतच्या वक्तव्याचा निषेध का केला नाही? असा प्रश्न एका युजरने विचारला आहे.
कंगना उर्मिला मातोंडकरबाबत काय म्हणाली होती?
“उर्मिला मातोंडकर ही सॉफ्ट पॉर्नस्टार आहे. ती तिच्या अभिनयासाठी ओळखली जात नाही. ती ओळखली जाते ती फक्त तिच्या सॉफ्ट पॉर्नसाठी तिला तिकिट मिळू शकतं तर मला का नाही? ” असा प्रश्न कंगनाने विचारला होता. तिचा हाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कंगनाने २०२० मध्ये एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा उल्लेख केला आहे.