‘नेमेचि येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे दरवर्षी पाऊस येतो, पावसाच्या श्रावण सरींबरोबर जे उत्सव येतात त्यात दहीहंडी हा सार्वजनिक उत्सव म्हणून मोठा ठरतो. मग गणरायाच्या आगमनाची चाहूल लागते. पण सार्वजनिक सणांचा शुभारंभ उंचच उंच दहीहंडी फोडून होतो. सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीबाबत आणि गोविंदाच्या वयावर घातलेल्या बंधनामुळे यावर्षी दहीहंडीच्या राजकारणाला एक वेगळाच रंग चढणार आहे. पण दरवर्षी दहीहंडीच्या निमित्ताने गल्ल्यागल्ल्यांमध्ये हे राजकारण रंगतं. मध्यरात्री शहरातली मोठी दहीहंडी फु टली की त्या हंडीच्या तुकडय़ांबरोबर ते राजकारणही दूर विखुरलं जातं ते थेट पुढच्या दहीहंडीला सगळ्यात उंचीवर पुन्हा लटकलेलं दिसतं. वर्षांनुर्वष दहीहंडीच्या निमित्ताने रंगणारा हा राजकारणाचा आणि त्यामुळे ढवळून निघणाऱ्या समाजकारणाचा काला पहिल्यांदाच ‘कान्हा’ या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
एका गॅपनंतर दिग्दर्शक अवधूत गुप्तेंचा ‘कान्हा’ तितक्याच समर्थपणे दहीहंडीभोवती रचल्या जाणाऱ्या या राजकारणाचा वेध घेताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या कथेची मुळं ही २००९च्या दहीहंडीत सापडतील, असं अवधूत गुप्ते सांगतात. २००९ मध्ये गोविंदांनी नऊ थरांचा विश्वविक्रम केला होता. त्या वेळी एक गोविंदा म्हणून दहा थरांचा विक्रम कधी रचला जाणार, अशी एक उत्सुकता मनात निर्माण झाली. आज सात र्वष झाली आहेत तरीही दहा थरांचा विक्रम का झाला नाही? याचं उत्तर शोधताना ‘कान्हा’ची संहिता तयार झाली, अशी माहिती अवधूत गुप्ते यांनी दिली. एरव्हीही दहीहंडीवरून जे राजकारण केलं जातं त्यातून गोविंदाच्या हाती काहीच लागत नाही. कित्येकांना तर काय चाललं आहे याचा पत्ताही नसतो. ते त्या खेळाच्या साहसाच्या आकर्षणापायी यात दरवर्षी न चुकता सहभागी होत असतात. २००९ नंतर दहीहंडीच्या वेळेस रचल्या जाणाऱ्या या उंचच उंच थरांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. त्यानंतर या उत्सवावर अनेक बंधनं आली. यात होत गेलेल्या प्रत्येक बदलानंतर नव्याने चर्चा झडली, टीकेचे सूर उमटले पण एकूणच दहीहंडीचे स्वरूप आणि त्यात सहभागी होणारे गोविंदा यांच्यावर याचा काडीमात्र परिणाम झाला नाही. हे असे का झाले? दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जाही सरकारकडून मिळाला असला तरी पुन:पुन्हा त्याच्यावरचे वाद हे उत्सव म्हणूनच होत राहिले, अशा अनेक गोष्टींचा, घटकांचा ऊहापोह या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दहीहंडी अनेक चित्रपटांमधून पाहायला मिळाली आहे. ‘आला रे आला’ अशी साद अनेक हिंदी-मराठी गाण्यांमधून ऐकायला मिळाली आहे. मात्र दहीहंडीच्या उत्सवावर पहिल्यांदाच हा चित्रपट येतो आहे. यात पुन्हा एकदा दोन मंडळांमधील टशन पाहायला मिळणार आहे. गश्मीर महाजनी आणि वैभव तत्त्ववादी हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. संहिता तयार होत असतानाच या दोघांची नावे डोळ्यासमोर होती. त्यांचे चित्रीकरणाचे वेळापत्रक व्यग्र असूनही त्यांच्या तारखा मिळाल्या, सगळ्या गोष्टी जुळून आल्या त्यामुळे ‘कान्हा’ची वाट सुकर झाल्याचेही त्यांनी मिश्कीलपणे सांगितले. या चित्रपटात नायिका म्हणून गौरी नलावडे दिसणार आहे. गौरीनेही यात गोविंदा पथकातील खेळाडूची भूमिका केली आहे. तिने खास या चित्रपटासाठी सराव करून दहीहंडीच्या थरावर ती चढली असल्याची माहितीही अवधूतने दिली. ‘कान्हा’चे प्रोमो पाहताना ‘मोरया’ चित्रपटाची हटकून आठवण होते. तिथेही गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर दोन मंडळांमधले भांडण पाहायला मिळाले होते. मात्र हा सारखेपणा दिसणारच. त्याला पर्याय नसल्याचं अवधूतने स्पष्ट केले. दहीहंडी आणि गणेशोत्सव यांचे स्वरूप एकसारखेच आहे, दोन्हीकडे सार्वजनिक मंडळे आणि त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे कथेत तो सारखेपणा जाणवणार. मात्र दहीहंडीचा विषय वेगळाच असल्याने ‘कान्हा’ पाहिल्यावर दोन चित्रपटांमधील फरक लक्षात येईल, असं त्यांनी विश्वासाने सांगितलं. अवधूत गुप्तेंच्या चित्रपटांची गाणी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. याही वेळी चित्रपटासाठी गाणी करताना खूप मजा आल्याचे अवधूतने सांगितले. अरविंद जगताप यांनी ‘गोपाळा रे गोपाळा’ हे गाणं लिहिलं आहे, ज्यात त्यांनी गोविंदांना जो बिचारेपणा आला आहे त्याचं वर्णन केलं आहे. जगताप यांनीच ‘झेंडा’चं शीर्षकगीत लिहिलं होतं, जे खूप गाजलं. आत्ताही त्यांनी या गाण्यातून गोविंदांच्या आजच्या परिस्थितीवर अचूक बोट ठेवलं असून हे गाणं सुरेश वाडकर आणि कैलाश खेर यांनी गायलं असल्याची माहिती अवधूतने दिली. याशिवाय, दहीहंडीची गाणी म्हणून ‘मित्रा’, ‘रडायचं नाही आता चढायचं’, ‘मार किक रे गोविंदा’ या गाण्यांबरोबरच कृष्णजन्माचं एक वेगळं गाणं चित्रपटात पाहायला मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.
एक संगीतकार, गायक, मुलाखतकार आणि दिग्दर्शक अशा सगळ्याच आघाडय़ांवर अग्रणी असलेल्या अवधूत गुप्ते यांनी २०११ मध्ये
‘मोरया’ केला होता. त्यानंतर २०१३ मध्ये वरून ‘जय महाराष्ट्र धाबा भतिंडा’ आणि गेल्या वर्षी ‘एकतारा’ चित्रपट केला. ‘एकतारा’ या चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर वर्षभराने ‘कान्हा’च्या निमित्ताने दिग्दर्शक म्हणून ते पुन्हा रसिकांसमोर येत आहेत. चित्रपट दिग्दर्शन हा आपला व्यवसाय नाही. गाणं-संगीत हे पहिलं वेड आहे. त्यामुळे एकापाठोपाठ एक फक्त चित्रपट करण्यात रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी संगीतकार-गायक-दिग्दर्शक म्हणून सतत काम करतो आहे. शिवाय वर्षभर गाण्यांचे कार्यक्रम असतात. मग एखाद्या ‘खुपते तिथे गुप्ते’सारख्या शोचे सूत्रसंचलनही करतो. त्यामुळे कामाच्या बाबतीत ही वेळेची विभागणी अटळ असल्याचे त्यांनी सांगितले. अगदी आत्ताही ‘कान्हा’ प्रदर्शित होत असतानाच नव्या चित्रपटाची संहिताही तयार आहे. पण त्याआधी पुन्हा संगीतकार-गायक म्हणून एखादा अल्बम करेन, त्यानंतर टीव्हीवर शोही करण्याच्या बेतात असल्याचा सूचक इशाराही त्यांनी दिला. संगीत हे सगळ्यात जवळचं आहे, जिव्हाळ्याचं आहे पण दिग्दर्शन हे आईच्या धाकटय़ा मुलासारखं आहे. त्याचंही कोडकौतुक असतंच. त्यामुळे या सगळ्याचा समतोल साधतच पुढची वाटचाल करायची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दहीहंडीच्या खेळातली निरागसता संपली ती राजकारण्यांनी प्रत्येक थराभोवती पैसे वाटायला सुरुवात केल्यानंतर. आज त्या दहीहंडीला एक मोठं ग्लॅमर आलं आहे, मात्र त्या ग्लॅमरमध्ये हा सणही हरवला आहे आणि खेळही हरवला आहे. चोरपावलांनी या खेळात शिरलेल्या राजकारणाने ‘दहीहंडी’चा रंगच बदलून टाकला. हा बदलत गेलेला रंग आणि त्यात हरवलेले गोविंदा याचे चित्रण ‘कान्हा’त आहे. राजकारण हे प्रत्येक खेळात असतं, पण राजकारण करण्याइतका तो
खेळ तर मोठा व्हायला हवा, असे सांगत खेळ म्हणून तरी दहीहंडीकडे पाहा आणि तो खेळ वाढवण्यासाठी प्रयत्न करा म्हणजे गोविंदांचंही भलं होईल, अशी भूमिका या चित्रपटातून मांडली असल्याचे अवधूत गुप्ते यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा