‘कारिया’, ‘क्रांतिवीर संगोली रायण्णा’, ‘कलासिपल्य’, अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारा लोकप्रिय कन्नड अभिनेता दर्शन थूगुदीपा आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री पवित्रा गौडा यांना मंगळवारी बंगळुरूमधून अटक करण्यात आली आहे. या दोघांवर एका ३३ वर्षीय व्यक्तीच्या हत्येचा आरोप आहे. मृताने अभिनेत्रीबद्दल अपमानास्पद कमेंट्स केल्या होत्या, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. रेणुकास्वामी असं मृताचं नाव आहे आणि तो दर्शनचा चाहता होता.
रेणुकास्वामीचा मृतदेह ९ जून रोजी सापडला होता. नंतर दर्शन आणि इतर १२ जणांना रेणुकास्वामीच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक करून चौकशी सुरू केली आहे. या सर्वांना बंगळुरूच्या दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं, या सर्वांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहरातील एका नाल्यात एक अज्ञात मृतदेह पडून आहे, अशी माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली होती. नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि फॉरेन्सिक रिपोर्टनुसार त्याचा खून झाल्याचं स्पष्ट झालं. याप्रकरणी तपास करत पोलिसांनी ११ जणांना अटक केली आणि त्यांच्या जबाबाच्या आधारे दर्शन आणि पवित्रा यांना अटक करण्यात आली. “या खूनात अभिनेता दर्शन थेट सहभागी होता की तो फक्त कट रचण्यात सहभागी होता हे शोधण्यासाठी आम्ही तपास करत आहोत,” असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आजकालची मुलं आई-वडिलांची…”
कामाक्षीपल्य पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पट्टणगेरे भागातील एका शेडमध्ये रेणुकास्वामीची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह जवळच्या नाल्यात फेकण्यात आला होता. रेणुकास्वामीला मारहाण झाली व त्याचा खून झाला तेव्हा दर्शन व पवित्रा दोघेही तिथे उपस्थित होते, असं पोलिसांनी म्हटलं आहे. “अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्यावर त्याच्या शरीरावरील जखमांच्या आधारे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे मृताची ओळख पटवण्यात आली आणि त्याचं नाव रेणुकास्वामी असल्याचं कळालं,” असं बंगळुरूचे पोलीस आयुक्त बी. दयानंद म्हणाले.
मृत रेणुकास्वामी हा मूळचा चित्रदुर्ग इथला रहिवासी होता आणि तो एका फार्मा कंपनीत काम करायचा. त्याला चित्रदुर्गहून २०० किलोमीटर दूर बंगळुरूला आणून मग खून करण्यात आला. मृताने सोशल मीडिया पोस्टमध्ये पवित्रा गौडाबद्दल अपमानास्पद कमेंट्स केल्याचा आरोप आहे. बंगळुरू शहराचे पोलीस आयुक्त बी दयानंद म्हणाले की आतापर्यंतच्या तपासावरून असं दिसून येतंय की पवित्राबद्दल इन्स्टाग्रामवर अपमानास्पद कमेंट्स केल्यामुळे आणि मेसेज पाठवल्यामुळे दर्शन रेणुकास्वामीवर चिडला होता. ४७ वर्षीय दर्शनला म्हैसूरमधून या खून प्रकरणात अटक करण्यात आली, असं पोलिसांनी सांगितलं.
बॉयफ्रेंडपेक्षा वयाने मोठी आहे सोनाक्षी सिन्हा, अभिनेत्री ३७ वर्षांची तर झहीर इक्बालचं वय…
मृताच्या आई-वडिलांनी फोडला हंबरडा
पोलिसांनी मृतदेह सापडल्यानंतर रेणुकास्वामीच्या आई-वडिलांना माहिती दिली. मुलाच्या खूनाबद्दल कळताच त्यांनी हंबरडा फोडला. “तो माझा एकुलता एक मुलगा होता. गेल्या वर्षीच त्याचं लग्न झालं. मी शनिवारीच त्याच्याशी बोललो होतो, आम्हाला न्याय पाहिजे,” असं त्याचे वडील श्रीनिवासय्या यांनी म्हटलंय.
घटनेवर कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा म्हणाले, “चित्रदुर्गातील एका व्यक्तीची बंगळुरूमध्ये हत्या करण्यात आली. याप्रकरणी काही लोकांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्या चौकशीदरम्यान दर्शनचे नाव समोर आले आहे, त्यामुळे त्याला चौकशीसाठी आणण्यात आलं आहे. या खूनात दर्शनचा सहभाग आहे की नाही, त्याबद्दल तपास होईपर्यंत काहीही सांगता येणार नाही. हत्येमागचे कारण काय? त्याचे नाव या प्रकरणात का आले? या सर्व गोष्टींची उत्तरं तपासानंतरच मिळतील.”