‘कांतारा’ या चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. आधी फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने थेट व्हिएतनामपर्यंत मजल मारली आहे. जगभरात या चित्रपटाचं कौतुक होत आहे. मनोरंजनसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी ‘कांतारा’चं तोंडभरून कौतुक केलं आहे तर काहींनी या चित्रपटावर सडकून टीकादेखील केली आहे. एकूणच बॉक्स ऑफिस हादरवून टाकणारा हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे.
चित्रपटात रिषभ शेट्टीने मुख्य भूमिका साकारली आहे तसेच या चित्रपटाचं लिखाण आणि दिग्दर्शन खुद्द रिषभनेच केलं आहे त्यामुळे रिषभचं प्रचंड कौतुक होत आहे. खुद्द रजनीकांत यांनीसुद्धा रिषभची भेट घेऊन त्याचा सन्मान केल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. या चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशासाठी रिषभने आभार मानले आहेत.
आणखी वाचा : ‘कांतारा’चा हिंदी रिमेक येणार? अभिनेता दिग्दर्शक रिषभ शेट्टीचा खुलासा
चित्रपटाच्या यशानंतर नुकतंच रिषभ शेट्टीने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले आहे. नुकतंच रिषभला सिद्धिविनायक मंदिराबाहेर पाहिलं गेलं. ‘कांतारा’ला मिळणाऱ्या यशासाठी रिषभ सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेण्यासाठी आला असल्याचं सांगितलं जात आहे. बाहेर पडताना पत्रकारांच्या कॅमेरामध्ये तो कैद झाला आणि तिथल्या काही चाहत्यांनाही त्याने थांबून फोटो काढू दिले.
चित्रपटाच्या कमाईचे आकडे दिवसागणिक वाढतच आहेत. जगभरात या चित्रपटाने २०० कोटीचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाची लोकप्रियता एवढी वाढली आहे की याचा दूसरा भागही काढावा अशी मागणी होताना दिसत आहे. रिषभ शेट्टी याने अजूनतरी असा काही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ३० सप्टेंबरला प्रदर्शित होऊन अजूनही चित्रपटगृहाकडे प्रेक्षकांना खेचून आणणारा ‘कांतारा’ हा कन्नड चित्रपटविश्वातील अत्यंत महत्त्वाचा चित्रपट आहे.