२०२२ हे वर्षं बॉलिवूडसाठी तितकं लाभदायक नव्हतं हे अगदी उघड सत्य आहे. कमी बजेटमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा कन्नड चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टी हा चांगलाच चर्चेत आला आहे. रातोरात रिषभ स्टार झाला. एकूणच यावर्षी दाक्षिणात्य चित्रपटांनी हिंदी चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर दिली आहे.
इतकंच नाही तर यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या ६ चित्रपटांपैकी ५ चित्रपट हे दाक्षिणात्य चित्रपट आहे, आणि हे बघायला गेलं तर आनंदाची गोष्ट आहे तसंच ही हिंदी चित्रपटसृष्टीसाठी चिंतेची बाबही आहे. हिंदी चित्रपटसृष्टी ही कुठेतरी प्रेक्षकांपासून दूर जात असल्याची खंतही कित्येक प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे. शिवाय हिंदीतही ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘भूलभुलैया २’ हे चित्रपट वगळता बाकी मोठमोठ्या सुपरस्टार्सची चित्रपट दणकून आपटले आहेत.
यावर्षी एकंदरच बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांनी चांगलीच बाजी मारली असून ‘केजीएफ चॅप्टर २’ आणि ‘आरआरआर’ हे दोन चित्रपट जगभरात सर्वाधिक कमाई करणारे भारतीय चित्रपट ठरले आहेत. ‘केजीएफ २’ ने जगभरात १२३५.२ कोटी तर ‘आरआरआर’ने जगभरात ११३५.८ कोटी एवढी कमाई केली आहे. मणिरत्नम यांच्या ‘पीएस १’ या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर ५०० कोटीची कमाई केली आहे. कमल हासन यांचा ‘विक्रम’ आणि रणबीर कपूर आलिया भट्टच्या बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटांनीही दमदार कमाई केली आहे. ‘विक्रम’ या चित्रपटाने ४२४.४ कोटी तर ‘ब्रह्मास्त्र’ने जगभरात ४३० कोटींची कमाई केली आहे.
आणखी वाचा : सोनाली फोगट हत्या प्रकरणातील CBI चौकशी दरम्यान मोठा खुलासा; भाजपा नेत्याला पर्सनल असिस्टंटनेच…
रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ने तर ४०० कोटी कमाईचा आकडा गाठला असून, कन्नड भाषेत ‘केजीएफ २’ या चित्रपटाने मागे टाकलं आहे. अगदी कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात जबरदस्त कमाई करत प्रेक्षकांना चित्रपटाशी बांधून ठेवलं आहे.