रिषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा’ची चर्चा सर्वत्र आहे. या चित्रपटाने चित्रपटगृहात ४५ दिवस पूर्ण केले असून बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. ‘कांतारा’ १४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचे बजेट केवळ २० कोटी होते. या बजेटवर आणि लोकांच्या प्रतिसादावर या चित्रपटाने आतापर्यंत २८८.९३ कोटींची कमाई केली आहे. रिषभ शेट्टीने या चित्रपटात अभिनय केला असून याचं लेखन आणि दिग्दर्शनही त्यानेच केलं आहे.
या चित्रपटात रिषभची पत्नी प्रगती शेट्टी हिनेदेखील महत्त्वाची भूमिका निभावली. प्रगतीने पडद्यावर नव्हे तर पडद्यामागून मेहनत घेतली आहे. या चित्रपटाचं कॉस्च्युम डिजायनर म्हणून प्रगतीने काम केलं आहे. एका वृत्तवहिनीशी संवाद साधताना याविषयी रिषभ आणि प्रगती यांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे अनुभव शेअर केले आहेत.
आणखी वाचा : ‘RRR’ चा एक सीन शूट करेपर्यंत अक्षय कुमारचा चित्रपट पूर्ण होतो – राम चरण
प्रगतीने या चित्रपटासाठी १००० कॉस्च्युम तयार केले, त्यापैकी ३५० डिझाईन ही रिषभसाठी होती तर ६०० हून अधिक डिझाईन ही सप्तमी गौडा या अभिनेत्रीसाठी होती. याविषयी बोलताना प्रगतीने सांगितलं की या चित्रपटाची जेव्हा स्क्रिप्ट तयार झाली तेव्हा ती गरोदर होती, त्याचदारम्यान तिने याविषयी संशोधन सुरू केलं होतं. वेगवेगळ्या म्युझियम तसेच कर्नाटकातील कॉस्टल भागात जाऊन तिने यासाठी संशोधन केल्याचं स्पष्ट केलं.
केवळ पारंपरिक वेशभूषाच नव्हे तर अॅक्शन सीन्ससाठीसुद्धा कॉस्च्युम निवडण्यापासून थेट त्यांचे वेगवेगळे जोड तयार करण्यापर्यंत यात बरीच मेहनत होती हेदेखील प्रगतीने स्पष्ट केलं. कांतारा हा कथा आणि अभिनयाबरोबरच त्याच्या वेशभुषेमुळे आणि अलंकारांच्या योग्य वापरामुळे जास्त चर्चेत आला आणि याचं संपूर्ण श्रेय जातं ते म्हणजे प्रगती शेट्टीला. अजूनही ‘कांतारा’ चित्रपटगृहात ठाण मांडून बसला आहे. कन्नड चित्रपटांच्या इतिहासातील हा एक अत्यंत महत्त्वाचा चित्रपट ठरला आहे.