‘कांतारा’ स्टार रिषभ शेट्टीलाही राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. समारंभाच्या दोन दिवस आधी त्याला निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली होती. खुद्द रिषभ शेट्टीने ही बातमी सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. तसेच राम मंदिराच्या अभिषेकाच्या निमंत्रण पत्राचा फोटोही शेअर केला आहे. २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातील बऱ्याच बड्या व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी, राजकारण ते क्रीडा आणि व्यावसायिक जगतातील अनेक दिग्गज व्यक्ती प्राणप्रतिष्ठा विधीच्यावेळी अयोध्येत हजर असणार आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्या तारकांना या विधीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे त्यात राम चरण व त्याची पत्नी उपासना, चिरंजीवी, मोहनलाल, प्रभास, धनुष आणि रजनीकांत या दिग्गज मंडळींची नावे आहेत. आता यामध्ये ‘कांतारा’फेम रिषभ शेट्टीचे नावही जोडले गेले आहे.
आणखी वाचा : CID बंद झाल्यावर लता मंगेशकरांनी अमेरिकेतील सोनीच्या कार्यालयात केलेला कॉल; दयाने सांगितलं नेमकं कारण
राम मंदिराच्या अभिषेकाचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर रिषभ शेट्टीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला आणि लिहिले, “या संधीसाठी मी खूप आभारी आहे, माझे हृदय कृतज्ञतेने भरले आहे. जय श्री राम.” याबरोबरच त्याने एक चिठ्ठीही लिहिली आहे, “आम्ही लहानपणापासून रामाचे नाव घेत आणि मोठ्यांकडून त्यांच्या कथा ऐकत मोठे झालो. आज श्रीरामांनी मला अयोध्येसाठी निमंत्रण पाठवले आहे. ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि नंतर राजा म्हणून त्यांनी तिथे राज्य केले. या संधीबद्दल मी खूप आभारी आहे.”
अनुपम खेर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रणदीप हुडा, लिन लैश्राम, अमिताभ बच्चन, कंगना रणौत, अनुष्का शर्मा आणि अक्षय कुमार यांच्यासह बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात आले आहे. १८ जानेवारी रोजी राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. आता अभिषेक सोहळा २२ जानेवारी २०२४ रोजी १२.१५ ते १२.४५ या वेळात संपन्न होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.