सध्या बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपटांचे वर्चस्व आहे. पॅन इंडिया या संकल्पनेचा फायदा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला झाला. वेगवेगळे विषय, चित्रपट निर्मितीमध्ये होणारे नवे प्रयोग, सादरीकरणातील नाविन्य अशा काही कारणांमुळे प्रेक्षक या चित्रपटांकडे वळले आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये प्रादेशिक स्वाभिमान देखील पाहायला मिळतो. ‘बाहुबली’, ‘पुष्पा’, ‘केजीएफ’ असे अनेक चित्रपट बॉलिवूडच्या हिंदी चित्रपटांपेक्षा सरस ठरत आहेत. या यादीमध्ये ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटाचे नाव जोडले गेले आहे.
हा कन्नड चित्रपट ३० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. कन्नडसह अन्य भाषिक प्रेक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले. बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या माध्यमातून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती निर्मात्यांना मिळाली. पुढे त्यांनी हिंदीसह तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्ये डब करुन प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. ऋषभ शेट्टी हे या चित्रपटाचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. तसेच त्यांनी चित्रपटातील शिवा हे मुख्य पात्रदेखील साकारले आहे. ऋषभ शेट्टी यांच्यासह सप्तमी गौडा, किशोर, अच्युत कुमार असे कलाकार या चित्रपटामध्ये आहेत.
‘कांतारा’चा हिंदी ट्रेलर काही तासांपूर्वी यूट्यूबवर पोस्ट करण्यात आला आहे. ट्रेलरची सुरुवात ‘फार पूर्वी एक राजा होता. या राजाने देवता म्हणून पुजल्या जाणाऱ्या दगडाच्या मोबदल्यामध्ये गावकऱ्यांना भलीमोठी जमीन दिली होती’ या वाक्याने होते. अडीच मिनिटांच्या ट्रेलरवरुन हा चित्रपट पौराणिक देवीदेवता, गावाकडील समजूती आणि अंधश्रद्धा यांच्यावर आधारित असल्याचे लक्षात येते. गावातील ‘फॉरेस्ट ऑफिसर’ आणि ‘शिवा’ या दोन पात्रांभोवती चित्रपटाचे कथानक फिरते. हा चित्रपट १४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
आणखी वाचा – अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी खूशखबर, फक्त ८० रुपयाला मिळणार चित्रपटाचे तिकीट
‘केजीएफ’, ‘केजीएफ २’ असे चित्रपट बनवणाऱ्या होंबळे फिल्म्स या निर्मिती संस्ठेने ‘कांतारा’ची निर्मिती केली आहे. किच्चा सुदीप, प्रभास अशा सुपरस्टार्सनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी आयुष्मान खुरानाचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.