गेल्याच महिन्यात ‘देशद्रोही’ चित्रपटाचा अभिनेता कमाल खानबरोबरच्या टि्वटरवरील वादानंतर आता विनोदवीर कपिल शर्मा आणखी एका वादात सापडला आहे. ‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’ शोच्या या सूत्रसंचालकावर ‘बिग बॉस ७’ चा स्पर्धक एजाझ खानने आपल्यावर चित्रीत करण्यात आलेला ‘कॉमेडी नाईटस…’च्या शोचा भाग दाखविण्यात न आल्याचा आणि आपला फोन घेत नसल्याचा आरोप केला आहे. काही महिन्यांपूर्वी ‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’ या शोच्या एजाझ खानवरील भागाचे चित्रीकरण करण्यात आले होते. मुंबईत एका संगीत अल्बमच्या अनावरण सोहळ्यात दोघेही उपस्थित असताना एजाझने ‘कॉमेडी नाईटस…’चा सदर भाग न दाखविल्याचा कपिलवर आरोप केला.
एका वृत्तवाहिनीवर दाखविण्यात आलेल्या व्हिडिओत एजाझ खान कार्यक्रमाला उपस्थित लोकांसमोर कपिलवर आरोप करताना दृष्टीस पडतो. व्हिडिओतील एका दृष्यात कपिलला मधेच थांबत एजाझ म्हणतो, मला वाटल तू एक चांगला माणूस आहेस. मी तूला मेसेज पाठवले, टि्वट केले आणि फोनसुद्धा केला. परंतु, तू यापैकी कशावरही माझ्याशी संपर्क साधला नाहीस. मला सेलिब्रिटी म्हणून तुझ्या शोमध्ये बोलावण्यात आले होते आणि मी एक सेलिब्रिटीच आहे. माझे संवाद बदलण्यात आले होते, परंतु तुला विचारून स्वत:च्या काही संवादांची मी यात भर घातली होती. मला खरं काय ते सांग, अशी विचारणा करताना एजाझ या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो. त्याच्या या बोलण्यावर आम्ही तुझा भाग लवकरच दाखविणार असल्याचे कपिल एजाझला सांगतो. पुढे जाऊन कपिल एजाझला मिठी मारत त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करतो. परंतु नकार ऐकण्यास तयार नसलेला एजाझ म्हणतो, एक अभिनेता म्हणून तू माझ्या टि्वटला रिप्लाय द्यायला हवा होतास. मी टि्वट केल्याचे सर्वांना माहिती आहे. ज्या कमाल खानने तुला शिव्या हासडल्या त्याला तू रिप्लाय दिलास, परंतु मला रिप्लाय द्यायचे टाळलेस. एजाझच्या बोलण्यावर लवकरच आम्ही तुझा शो दाखविणार असल्याची कपिलने रट लावली होती. याविषयीचा खुलासा करताना कपिल म्हणाला, कहीवेळेस काही भागांचे चित्रीकरण आधीच करून ठेवले जाते आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेनुसार दाखविले जाते. याआधी ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी-शोमध्ये एजाझ खान दिसला होता.

Story img Loader