‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शोमुळे भलताच नावारूपाला आलेला विनोदी अभिनेता कपिल शर्मा आता चित्रपटात पदार्पण करणार असल्याचे समजते. एरवी आपल्या शोमधून रुपेरी पडद्यावरच्या कलाकारांची टोपी उडविणाऱ्या कपिल शर्माने आपल्या शोच्याच टीमबरोबर नव्या चित्रपटाची जुळवाजुळव सुरू केली आहे.
विनोदी अभिनेता आणि एका शोचा सूत्रसंचालक म्हणून कपिल शर्माने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. त्याच्या शोमध्ये आतापर्यंत बॉलिवूडच्या जवळपास सर्व आघाडीच्या कलाकारांनी हजेरी लावली आहे. शाहरूख खानने कपिलसोबत दोनदा कॉमेडी नाईट्स कार्यक्रमात रंगत आणली. त्यामुळे कपिलने जर चित्रपटात काम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला तर त्याला संधी मिळणार नाही, असे होणार नाही. पण एक संपूर्ण शो आपल्या हरहुन्नरीवर यशस्वी करणाऱ्या कपिलला चित्रपट क्षेत्रातला अभिनयाचा श्रीगणेशा स्वत:च्या ताकदीवर बहुधा करायचा असावा. म्हणूनच त्याने बॉलिवूडच्या कोणत्याही प्रथितयश निर्माता-दिग्दर्शकाकडे भूमिकेसाठी विचारणा केलेली नाही. उलट ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शोचा दिग्दर्शक राजीव धिंग्रा याच्याबरोबर त्याने चित्रपटाची जुळवाजुळव सुरू केली आहे. राजीव धिंग्रा यांनी ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोचे चौथे पर्व आणि कॉमेडी सर्कसचे काही शोज् दिग्दर्शित केले होते. आता कपिलच्या मदतीने तेही चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. या चित्रपटात कपिलबरोबर ‘कॉमेडी नाईट्स’मधील त्याचा सहकलाकार सुनील ग्रोव्हर याचीही भूमिका असणार आहे. तर तिसऱ्या भूमिकेसाठी कपिलने अभिनेता नवाझुद्दिन सिद्दिकी याला विचारणा केली आहे. नवाझुद्दिनच्या भूमिकेसाठी कपिलने खरे तर इरफान खानला विचारायचे ठरविले होते. मात्र दिग्दर्शक राजीव धिंग्रा यांनी नवाझुद्दिन सिद्दिकी हाच या भूमिकेसाठी योग्य असल्याचा हट्ट धरल्याने आता ही भूमिका नवाझुद्दिनच्या होकाराच्या प्रतीक्षेत आहे. कपिल आणि राजीव धिंग्रा हे खूप वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र असल्यामुळे चित्रपटासाठीही त्याचीच मदत घेण्याचे कपिलने ठरविले असून एप्रिल अखेरीपर्यंत या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil sharma moves to big screen