देशभरामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यातील मतदान नुकतंच पार पडलं आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील कलाकारही सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. मात्र अभिनेत्री आलिया भट्टने चक्क निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासोबतच जर तिने भविष्यकाळात निवडणूक लढविली तर तिचं निवडणुकीचं चिन्ह कोणतं असेल हेदेखील तिने सांगितलं.

काही दिवसांपूर्वीच आलियाने ‘द कपिल शर्मा शो’च्या मंचावर उपस्थिती दर्शविली होती. यावेळी तिच्यासोबत वरुण धवन आणि सोनाक्षी सिन्हादेखील हजर होते. यावेळी कपिलने या तिघांनाही निवडणुकीसंदर्भात काही प्रश्न विचारले. या प्रश्न-उत्तरांच्या खेळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा वरुण, आलिया आणि सोनाक्षीला तुम्ही निवडणूक लढवली तर त्यांच्या पक्षाचं चिन्ह काय असेल असा प्रश्न विचारताना दिसत आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना  “माझ्या पक्षाचं चिन्ह ‘ताट’ असेल” असं आलियाने सांगितलं.

“राजकारणात खूप चमचे झाले आहेत, त्यामुळे माझ्या निवडणुकीचं चिन्ह ताट असेल”, असं उत्तर आलियाने यावेळी दिलं. सध्या आलियाच्या या उत्तराची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

दरम्यान, आलिया आणि तिची आई सोनी राजदान ब्रिटीश नागरिक असल्यामुळे आलिया यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करु शकणार नाहीये. कपिल शर्मा शोच्या मंच्यावर कलंकच्या टीमनं खूप मस्तीही केली. हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटात आलिया भट, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, माधुरी दीक्षित, संजय दत्त, कुणाल खेमू अशी तगडी स्टार कास्ट पाहायला मिळाणार आहे.