‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या शोमुळे घराघरांत पोहोचलेला विनोदवीर कपिल शर्मा सध्या अभिनेता म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी धडपडतो आहे. मात्र, अभिनयाबरोबरच आपल्यात गायकीचे गुण आहेत हे सांगण्याची; किंबहुना दाखवण्याची एकही संधी कपिलने वाया जाऊ दिली नव्हती. ‘कलर्स’ वाहिनीवरचा त्याचा गाजलेला शो असेल किं वा चित्रपट पुरस्कार सोहळ्यांचे सूत्रसंचालन करताना असेल त्याने आपल्या गायकीची झलक प्रत्येक वेळी दाखवून दिली आहे. आता थेट चित्रपटातून गाणं गाणेयाची संधी कपिलला मिळाली आहे.
छोटय़ा पडद्यावरून मोठय़ा पडद्यावर भरारी घेणारा कपिल शर्मा अब्बास-मस्तान दिग्दर्शित ‘किस किस को प्यार करूँ’ या चित्रपटातून हिंदूीत पदार्पण करणार आहे. खरं तर यशराज फिल्म्सच्या ‘बँकचोर’ या चित्रपटातून कपिल अभिनेता म्हणून आपल्या नव्या कारकीर्दीची सुरुवात करणार होता. मात्र, शोच्या चित्रीकरणाच्या वेळा सांभाळून चित्रपटासाठी काम करायला त्याला वाहिनीकडून मान्यता मिळाली नाही. अखेर त्याला यशराजच्या चित्रपटावर पाणी सोडावे लागले. मात्र, लगेचच अब्बास-मस्तान यांनी कपिलला आपल्या चित्रपटात भूमिका देत त्याचे बॉलीवूड पदार्पणाचे स्वप्न पूर्ण केले.
‘किस किस को प्यार करू’ या चित्रपटात कपिलबरोबर मंजिरी फडणीस आणि एली अवराम यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याच चित्रपटातून कपिल आपली गाण्याची हौस पूर्ण करणार आहे. त्याने स्वत: ट्विटरवर आपल्या गाण्याची वर्दी दिली आहे. हे गाणं कु ठलं, कोणत्या चित्रपटासाठी तो गातो आहे याबद्दल कुठलीही माहिती त्याने दिलेली नाही. मात्र, त्याने ‘किस किस को प्यार करू’ या चित्रपटासाठीच गाणे गायले असल्याचे सांगितले जाते. नुकत्याच झालेल्या पुरस्कार सोहळ्यात खुद्द अभिनेत्री रेखाने कपिलला सगळ्यांसमोर गाणं सादर करण्याची विनंती केली होती. तेव्हा वेळ न दवडता त्याने गाणे गायले होते. आता कॉमेडीबरोबरच अभिनय आणि गायनाचीही कवाडे कपिलसाठी खुली झाली आहेत.

Story img Loader