‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या टीव्ही-शोने प्रचंड लोकप्रियता मिळालेला प्रसिद्ध ‘स्टॅण्डप कॉमेडियन’ कपिल शर्मा हल्ली त्याच्या नखरेल वागण्याने चर्चेत आहे. एका प्रसिद्ध दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या चालू असलेल्या ‘सेलिब्रिटी किक्रेट लीग’ सामन्याच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल करणार होता. परंतु, कार्यक्रमाच्या ठिकाणी उशीरा येऊन शेवटच्या क्षणी कपिलने काढता पाय घेतला. कपिलच्या या नखरेल वागण्याने ‘मुंबई हिरोज’ टीमचे मालक सोहेल आणि सलमान खान कपिलवर अतिशय चिडले आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी उशिरा येऊन सूत्रसंचालनासाठीचा सराव करण्यास अवधी न मिळाल्याने कपिलने शेवटच्या क्षणी तेथून काढता पाय घेतला. अलिकडेच सलमान आणि सोहेल कपिलच्या ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ शोमध्ये ‘जय हो’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आले होते. कपिलची खान बंधुंशी जवळीक असल्याचे सर्वश्रूत आहे. आपल्या या वर्तनाने संतापलेल्या खान बंधुंशी पुन्हा जवळीक साधण्याचे कपिल प्रयत्न करीत असला तरी कपिलच्या अशा वागण्याने ऐनवेळी उदभवलेल्या प्रसंगामुळे खान बंधू कपिलला माफ करण्याच्या मनःस्थितीत दिसत नाहीत. मागील वर्षी, जेव्हा कपिलच्या ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ शोचा सेट आगीमध्ये बेचिराख झाला होता, तेव्हा सलमानने आपला ‘बिग बॉस’चा सेट त्याला वापरायला देऊन त्याच्या मदतीला धावून गेला होता.

Story img Loader