बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. प्रियांकानंतर आता दीपिका रणवीरही विवाहबंधनात अडकणार आहे. ‘तेव्हा सगळेच लग्न करत आहेत मग मी का मागे राहू?’ असं म्हणत कपिलनं त्याच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात कॉमेडीचा बादशाह कपिल प्रेयसी गिन्नीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे हे जवळजवळ नक्की झालं आहे.

जालंधरमध्ये मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडणार आहे. गिन्नी मुळची जालंधरची आहे म्हणून तिथेच हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. १२ डिसेंबरला कपिल गिन्नीचा विवाहसोहळा पार पडणार आहे. आयएनएसला दिलेल्या मुलाखतीत कपिलनं लग्नाची तारिख जाहीर केली आहे. कपिलच्या लग्नाची बातमी ही त्याच्या चाहत्यांचा आनंद द्विगुणीत करणारीच आहे. लग्नाआधी कपिल त्याच्या ‘द कपिल शर्मा’ शोममधून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार असल्याचंही म्हटलं जातं आहे.

कपिल आणि गिन्नीचं लग्न हे बिग फॅट पंजाबी वेडिंग असणार हे नक्की. चार दिवस हा विवाहसोहळा पार पडणार आहे याची तयारीही सुरू झाली असल्याची माहिती कपिलच्या मित्रानं दिली आहे.  कपिलला अत्यंत साधेपणानं आपला विवाहसोहळा उरकायचा होता. मात्र कपिलची आई आणि गिन्नीच्या कुटुंबियांनी थाटामाटात विवाह करण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यामुळे आई आणि सासरच्या मंडळींचा मान ठेवत कपिल अखेर थाटामाटात लग्न करायला तयार झाला आहे. १४ तारखेला रिसेप्शन सोहळाही पार पडणार आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात गिन्नीसोबतच आपला फोटो शेअर करत कपिलनं आपल्या नात्याची कबुली दिली होती.

Story img Loader