लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या लिएंडर पेस आणि रेहा पिल्लई यांच्यात सध्या मोठा वाद उद्भवला आहे. पूर्वीश्रमीची मॉडेल आणि लाईफस्टाईल कोच राहिलेल्या रेहा पिल्लईवर लिएंडरने जाहिररित्या अनेक आरोप केले आहेत. मात्र, या आरोपांच्या फैरीनंतर बॉलिवूडमधील दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने ट्विटरवरून रेहाची पाठराखण केली आहे. आपण गेली अनेक वर्षे रेहाला ओळखत असून तिचा स्वभाव प्रेमळ आणि प्रामाणिक असल्याचे करणने सांगितले. त्यामुळे तिच्यावरील सगळे आरोप निराधार असल्याचा दावा करणने केला आहे.

भारताचा टेनिसपटू लिएंडर पेसने वांद्रे येथील कुटुंब न्यायालयात नुकतीच रेहा पिल्लईविरूद्ध याचिका दाखल केली आहे. लिव्ह-इनमध्ये असलेल्या या दाम्पत्याला सहा वर्षांची मुलगी असून रेहा पालक म्हणून तिच्या देखभालीकडे दुर्लक्ष करत असल्याचा दावा पेसने आपल्या याचिकेत केला आहे. रेहा ही नेहमी आपल्याच धुंदीत वावरत असते, त्यामुळे पालक म्हणून जबाबदारी निभावण्यास ती असमर्थ असल्याचे कारण देत पेसने मुलीचा ताबा आपल्याकडे देण्यात यावा अशी मागणी केली आहे. तसेच तिने आपलीसुद्धा फसवणूक केली असून सध्या तिचे एका युवा क्रिकेटपटुशी घनिष्ट संबंध असल्याचे लिएंडर पेसने आपल्या याचिकेत म्हटले आहे.
रेहा पिल्लई हिने यापूर्वी अभिनेता संजय दत्तशी लग्न केले होते. त्यानंतर नोव्हेंबर २००३मध्ये रेहा आणि पेस यांची विमानप्रवासात भेट झाली आणि पुढे त्यांच्या या ओळखीचे रूपांतर नात्यात झाले. २००८ साली त्यांच्या मुलीचा जन्म झाला होता. यापूर्वीसुद्धा संजय दत्तबरोबरच्या घटस्फोटाबद्दलची खोटी माहिती देत रेहाने आपली फसवणूक केल्याचा आरोप लिएंडर पेसने केला आहे.

Story img Loader