इतिहासाचार्य ज्ञान प्रकाश यांच्या ‘मुंबई फेबल्स’ पुस्तकावर आधारित अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे वेलवेट’ या बहुचर्चित चित्रपटात चित्रपटकर्ता करण जोहरने खलनायकाची भूमिका साकारली. चित्रपटातील करण जोहरची संपूर्ण भूमिका हा सुद्धा चित्रपटाच्या वैशिष्ट्याचा एक भाग होता. प्रसिद्धी माध्यमांकडूनदेखील याची खास नोंद घेतली गेली. करणचा अभिनय असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोणताही करिष्मा दाखविला नाही. हाच धागा पकडून ‘बॉम्बे वेलवेट’मधील आपला अभिनय न आवडल्याने आपल्याकडे चित्रपटात अभिनय करण्याबाबत विचारणा होत नसल्याचे आपल्याला वाटते, असे करणने म्हटले आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या अपयशासाठी आपण अनुराग कश्यपला दोष देत नसल्याचे त्याने सांगितले. ‘बाहुबली’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांशी करण संवाद साधत होता. नकार देण्यासाठी प्रथम चित्रपटात काम करण्याबाबत विचारणा होणे गरजेचे असल्याचे तो म्हणाला. शाहरूख खान आणि काजोलचा अभिनय असलेल्या ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ या सुपरहिट चित्रपटात तो पहिल्यांदा छोट्याशा भूमिकेत दिसला होता. याशिवाय ‘ओम शांती ओम’, ‘लक बाय चान्स’ आणि ‘कल हो न हो’ चित्रपटातदेखील त्याचे दर्शन झाले होते.

Story img Loader