‘ओम शांती ओम’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसलेला निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आता खलनायकी छटेची मोठी व्यक्तिरेखा साकारणार आहे. वडिलांच्या नंतर धर्मा प्रॉडक्शन्स बॅनरची धुरा यशस्वीरित्या सांभाळून अनेक चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या करण जोहरने पाच चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. त्याचबरोबर ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाद्वारे छोटय़ा पडद्यावर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत तो दिसला. आता तो अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटात झळकणार आहे. करण जोहरनेही आता निर्मितीबरोबरच अभिनय गांभीर्याने करायचे ठरविलेय. मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय महानगर कसे बनत गेले हा चित्रपटाचा मुख्य विषय आहे. लेखक ज्ञान प्रकाश यांच्या ‘मुंबई फॅबल्स’ या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे.
शाहरूख खानची चित्रपटातील वेशभूषा कशी असावी यासाठीही करणने शाहरूखच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या तो झलक दिखला जा रिअॅलिटी शोचा परीक्षक म्हणून काम करतोय. सर्वसाधारणपणे दिग्दर्शक-निर्माता चित्रपटांत अभिनय करीत नाहीत. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, ओम शांती ओम आणि लक बाय चान्स या चित्रपटांतून छोटय़ाशा भूमिकेतून करणही यापूर्वी प्रेक्षकांना दिसला होता. ‘बॉम्बे वेलवेट’मध्ये मात्र तो अभिनेता रणबीर कपूरसमोर खलनायकी छटेत दिसणार आहे. कथानक ऐकल्यानंतर आणि भूमिका पाहिल्यानंतर आपण अभिनय करायला तयार झालो.
चार-पाच चित्रपटांचे दिग्दर्शन केले असले तरी अनुरागच्या दिग्दर्शनात अजिबात ढवळाढवळ न करता तो माझ्या भूमिकेकडे ज्या पद्धतीने पाहील आणि सांगेल तशा पद्धतीनेच आपण ही भूमिका साकारणार आहोत. माझ्यातील दिग्दर्शक मी पूर्णपणे बाजूला ठेवूनच सिनेमात वावरणार आहे, असे करण जोहरने स्पष्ट केले आहे. रणबीर आणि अनुष्का शर्मा ही जोडी या चित्रपटातून प्रथमच पडद्यावर दिसेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा