निर्माता-दिग्दर्शक करण जोहरची कोणतीही कृती चर्चेचा विषय ठरेल याचा काही नेम नाही. त्याच्या एका वाक्याचासुद्धा किती गहजब होतो याची प्रचिती पदोपदी येतेच. गेल्या तीन सिझनसाठी कलर्सच्या ‘झलक दिखला जा’ या रिअ‍ॅलिटी शोचा परीक्षकाचे पद भूषवणाऱ्या करणने कित्येकदा स्पर्धकांच्या, पाहुण्यांच्या किंवा माधुरी आणि रेमोच्या आग्रहाला बळी पडून आपल्या नृत्याचे कौशल्य कार्यक्रमादरम्यान दाखवले होते. अर्थात आयुष्यभर इतरांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या करणला आपल्या नृत्य कौशल्याची पुरेपूर जाणीव आहे. अनुराग कश्यपच्या आगामी ‘बॉम्बे व्हेल्हेट’ या चित्रपटातून त्याने अभिनयाचे शिवधनुष्य तर पेलेले आहे. मात्र, स्वतच्या नृत्यकलेवर त्याला विश्वास नाही. त्यामुळे शक्य तितक्या वेळेस समोरच्याला नकार देण्याचा प्रयत्न तो करत होताच पण नृत्याचा मंच असल्यामुळे त्याचा फारसा काही परिणाम होताना दिसत नसे.
अर्थात त्याच्या डान्स करण्याच्या या प्रयत्नांना सुरवातीला कौतुकाने पाहण्यात येत होते पण हळूहळू तो चेष्टेचा विषय बनू लागला होता. आणि याची करणला पुरेपूर जाणीव होती. त्यामुळे यंदाच्या सिझनमध्ये आपण कोणत्याही परिस्थितीत नाचणार नाही हे त्याने जाहीर करून टाकले आहे. नुकतीच या शोची पत्रकार परिषद मुंबईमध्ये पार पडली. त्यावेळी बोलताना, दरवेळी तुमच्या आग्रहाखातर मी नाचण्याचा प्रयत्न करतो पण यंदा तुम्ही कितीही गयावया केली तरी मी कोणत्याही परिस्थितीत नाचणार नाही असे करणने जाहीर केले आहे. यंदा स्पर्धा खूप कठीण असेल, स्पर्धकांच्या नृत्याचा कस लागणार आहे. यानिमित्ताने माधुरीहीे खास वेगळे नृत्यप्रकार शिकते आहे, तसेच यानिमित्ताने प्रसिद्ध डान्सर मॅस्किम श्मेकॉवस्की यालाही पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे अशा दिग्गजांपुढे नाचण्याचे आपल्याला दडपण आले असून म्हणूनच मी न नाचण्याचे ठरवले आहे असे त्याने जाहीर केले आहे.  

Story img Loader