रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. कुणी या चित्रपटाचं कौतुक करतंय तर कुणी यावर सडकून टीका करतंय. एवढं होऊनही चित्रपटाने ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे असं समोर आलं आहे. चित्रपट प्रदर्शित झाला आणि लगेचच तो ऑनलाईन लीकदेखील झाला. त्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटातल्या चुका दर्शवणारी कित्येक मीम्स व्हायरल झाली. आलिया रणबीर, बच्चनजी तसेच चित्रपटात वापरलेल्या स्पेशल इफेक्टवरही लोकांनी विनोदी मीम्स तयार करून व्हायरल केलं.
अशाच एका युझरने चित्रपटात दाखवलेल्या ब्रम्हांशच्या आश्रमाविषयी एक मजेशीर प्रश्न ट्विटरवर विचारला आहे. या प्रश्नाला चक्क निर्माता करण जोहरने उत्तर दिलं आहे. एका युजरने विचारलेला हा लॉजीकल प्रश्न आणि त्यावरचं करण जोहरचं उत्तर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : “भूमिकेसाठी जेलमधील कैद्यांबरोबर…” दिल्ली क्राइममध्ये नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या तिलोत्तमा शोमचा खुलासा
मयंक मेहता या ट्विटर युजरने एक प्रश्न विचारला. मयंक म्हणतो, “चित्रपटात जर आश्रमाची जागा कुठे आहे हे कुणालाच माहीत नसेल, ते एक सर्वात मोठं गुपित असेल तर मग त्या आश्रमाचा पत्ता गुगल मॅपवर कसा सापडेल? चित्रपटाने ३०० कोटी कमावले त्यामागे हे लॉजिक आहे का? हीच भारतीय कलात्मकता आहे का?”
मयंकच्या या प्रश्नाला आता खुद्द निर्माता करण जोहरने उत्तर दिलं आहे. करणने ट्वीट करत सांगितलं की, “आश्रमातील गुरु हे पात्र हे अगदी सामान्य माणसाप्रमाणे जीवन जगत आहे. ‘ब्रम्हांश’चे खरे पुढारी तेच आहेत हे कुणालाच माहीत नाही. त्यामुळे खऱ्या जगातील त्यांचं नाव आणि पत्ता हा गुगल मॅपवर असणं अगदी स्वाभाविक आहे.”
करणच्या या उत्तरामुळे त्या प्रश्नकर्त्याची शंका दूर झाली आहे. याबाबत त्याने करण जोहरचे आभारदेखील मानले आहेत. चित्रपटातील ही एकच नव्हे तर अशा बऱ्याच गोष्टींच्या लॉजिकवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. काही लोकांनी यामध्ये तर्क शोधण्यात काहीच अर्थ नाही असं म्हणत या चित्रपटाला तर्कहीन ठरवलं आहे.