निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक, कॉस्च्युम डिझायनर अशा विविध भूमिकांमध्ये वावरणारा करण जोहर प्रेक्षकांना आता लवकरच एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. बॉलीवूडच्या एका आगामी चित्रपटात करण चक्क खलनायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार असून यात तो एकदम नव्या लूकमध्ये असेल.
अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे वेलवेट’ या नव्या चित्रपटात करण जोहरचा हा नवा लूक सोशल मीडियावर काही छायाचित्रांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आला आहे. चित्रपटात करण ‘कैजाद खंबाटा’ ही भूमिका करत असून ती खलनायकाची आहे. चित्रपटातील करण जोहरच्या या खलनायकी भूमिकेबद्दल बॉलीवूडमध्ये चर्चा होती. करणने यापूर्वी दूरचित्रवाहिन्या तसेच काही चित्रपटांतून रुपेरी पडद्यावर दिसला असला तरी ‘बॉम्बे वेलवेट’मधील त्याची भूमिका एकदम वेगळी आहे. हा चित्रपट इतिहासकार ज्ञान प्रकाश यांच्या ‘बॉम्बे फेबल्स’ या पुस्तकावर आधारित आहे. चित्रपटात करण जोहरसह अनुष्का शर्मा, रणबीर कपूर हे प्रमुख कलाकार आहेत.
एखादा कलाकार त्याच्या प्रत्यक्षातील किंवा पडद्यावरील इमेजपेक्षा वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार असेल तर त्याची चर्चा जरा अधिकच होते. करण जोहरच्या ‘बॉम्बे वेलवेट’बाबत बॉलीवूडमध्ये तसेच झाले आहे. समस्त बॉलीवूडसह प्रेक्षकांचेही लक्ष करणच्या या नव्या लूककडे आणि चित्रपटाकडे लागले आहे. हा चित्रपट मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडय़ात प्रदर्शित होणार आहे.
करण जोहर खलनायक
निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक, कॉस्च्युम डिझायनर अशा विविध भूमिकांमध्ये वावरणारा करण जोहर प्रेक्षकांना आता लवकरच एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
First published on: 12-02-2015 at 07:28 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johars kaizad khambatta in upcoming bombay velvet