कलर्स टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय बिग बॉसचं १५ चं पर्व नुकतंच संपलं. पण या पर्वात सर्वाधिक चर्चेत राहिलेली जोडी होती करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश. बिग बॉसच्या घरात या दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा झाली आणि आता शो संपल्यानंतरही त्यांच्या नात्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. हे दोघंही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचा अंदाज आहे. एवढंच नाही तर करण कुंद्राच्या वडिलांनी स्वतः यावर प्रतिक्रिया दिली आहे. ज्याची सोशल मीडियवर बरीच चर्चा आहे.
सोशल मीडियावर करण कुंद्राच्या वडिलांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ते प्रसारमाध्यमांशी बोलताना दिसत आहेत. याच व्हिडीओमध्ये तेजस्वी आणि करण लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतील असा दावा ते करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये काही फोटोग्राफर्स करणच्या वडिलांना, ‘तेजस्वी आणि करणच्या नात्याला तुम्ही परवानगी तर दिली आहे. पण मग लग्नाबाबत काय विचार केला आहे?’ असा प्रश्न विचारताना दिसत आहेत. त्यावर करणचे वडील म्हणतात, ‘सर्व गोष्टी ठीक राहिल्या तर दोघंही लवकरच लग्न करतील.’
बिग बॉसच्या घरात जेव्हा फॅमिली वीक झाला होता त्यावेळी सर्व सदस्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यासोबत व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला होता. त्यावेळी करणनं तेजस्वीची त्याच्या आई-वडिलांशी ओळख करून दिली होती. त्यावेळी करणच्या वडिलांनी तेजस्वी आता घरातील खास व्यक्ती झाल्याचं म्हटलं होतं. एवढंच नाही तर तेजस्वीच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या या नात्याला परवानगी दिली होती.