मराठी सिनेमांची संख्या दिवसेंदिवस जसजशी वाढत आहे त्याचप्रमाणे निर्मात्यांची संख्याही तितक्याच वेगात वाढताना दिसत आहेत. नवनवीन विषय, तंत्रज्ञ याचा योग्य वापर करून मराठी सिनेमा आज एका वेगळ्या पातळीवर जाऊन पोहचला आहे. सध्याच्या या धकाधकीच्या आणि महागाईच्या दुनियेत प्रत्येकजण हा हिशेबी झालेला आहे. परंतु ह्या हिशेबीपणाच्या नादात अतिहिशेबीपणामुळे त्याचे परिणाम ही तितकेच वाईट येऊ शकतात. यामुळे आयुष्यात  कशी वेळ येऊ शकते? कसा गुंता निर्माण होऊ शकतो? ह्या सर्व गोष्टींवर भाष्य करणारा एका वेगळ्या धाटणीचा ‘करार ‘ हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.        
‘क्रॅक एंटरटेनमेंट’ च्या पूनम सिव्या यांची पहिलीच निर्मिती असलेल्या ‘करार’ सिनेमाचा मुहूर्त गोरेगाव येथील एका स्टुडियोमध्ये निर्माती,दिग्दर्शक, कलाकार आणि  तंत्रज्ञ मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सिनेमाचे दिग्दर्शन मनोज कोटीयान यांचे असून कॅमेरामन म्हणून शेखर नगरकर काम पहाणार आहेत. ह्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमाची कथा संजय जगताप यांनी लिहिली असून पटकथा आणि संवाद हेमंत एदलाबादकर यांचे आहेत. या सिनेमात अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री क्रांती रेडकर आणि उर्मिला कानेटकर यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या उत्तम गीतांना विजय गवंडे यांचे संगीत लाभणार  असून कोरिओग्राफर म्हणून सुभाष नकाशे काम पाहणार आहेत. या सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण मुंबई येथेच होणार असून हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karar marathi movie