हिंदी चित्रपटसृष्टीत ‘शंभर कोटींचा क्लब’ ही संज्ञा वापरली की, नेहमी सलमान, अजय आणि अक्षय यांच्याच नावाची चर्चा होते. मात्र अजय देवगण, अक्षय कुमार यांना मागे टाकणाऱ्या एकाही अभिनेत्रीचे नाव पुढे येत नाही. मात्र या क्लबमधील चित्रपटांच्या नावांवर नजर टाकली असता या क्लबमध्ये सलमानला टक्कर देणारा दुसरा कोणताही अभिनेता नसून दोन अभिनेत्री आहेत, हे स्पष्ट होते. बॉलिवूडमध्ये बेबो नावाने प्रसिद्ध असलेल्या करिना कपूर आणि ‘गजनी’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी असीन या दोघींमध्ये सध्या या शंभर कोटींच्या क्लबच्या निमित्ताने जोरदार स्पर्धा सुरू आहे.
‘रेफ्युजी’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या करिना कपूरला यशाची चव चाखण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागली नाही. पहिल्या चित्रपटानंतर दुसऱ्याच वर्षी आलेल्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाला यश मिळाले आणि करिनाने त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. ‘जब वुई मेट’मधील तिचे काम समीक्षक आणि प्रेक्षक या दोघांनाही पसंत पडले. मात्र तिला या शंभर कोटींच्या क्लबमध्ये शिरकाव करण्यासाठी नऊ वर्षे वाट पाहावी लागली. शंभर कोटी क्लबमध्ये जागा मिळवलेला ‘थ्री इडियट्स’ हा तिचा पहिला चित्रपट! त्यानंतर पुढील वर्षांत ‘गोलमाल ३’ या चित्रपटानेही या क्लबमध्ये जागा मिळवली. २०११ हे वर्ष करिनासाठी प्रचंड लाभदायक ठरले. या वर्षी करिनाच्या ‘बॉडीगार्ड’ आणि ‘रा वन’ या दोन चित्रपटांनी शंभर कोटी क्लबमध्ये प्रवेश मिळवला.
चित्रपटाच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा विचार केला, तर असीनने या क्लबमध्ये करिनापेक्षा कमी वेळेत चार चित्रपटांची नोंद केली आहे. असीनने २००८ मध्ये ‘गजनी’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि विशेष म्हणजे या चित्रपटाद्वारे ती थेट शंभर कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाली. त्यानंतर २०११ मध्ये आलेल्या ‘रेडी’ने शंभर कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला. २०१२ या एका वर्षां असीनच्या ‘हाऊसफुल २’ आणि ‘बोलबच्चन’ या दोन चित्रपटांनी शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवले.
या दोन्ही अभिनेत्रींना शंभर कोटींच्या क्लबमध्ये पहिल्यांदा घेऊन जाणाऱ्या चित्रपटांमध्ये आमीर खान होता. त्याचबरोबर या दोघींनीही सलमान खान आणि अजय देवगण यांच्यासह काम केलेले चित्रपट शंभर कोटी क्लबमध्ये पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, आता या दोघींचे चित्रपट एकाच वेळी प्रसिद्ध होत असून हे दोन्ही चित्रपट शंभर कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होतील, असे दोघींनाही वाटत आहे. असीन अक्षय कुमारसह ‘खिलाडी ७८६’ मध्ये आहे, तर करिना कपूर आमीर खानसह ‘तलाश’ या चित्रपटातून समोर येत आहे.
(चित्रपटासमोर कंसात त्या चित्रपटाची कमाई कोटींमध्ये)
करिना                      असीन
थ्री इडियट्स (२०२)   गजनी (११४)
गोलमाल ३ (१०७)     रेडी (११३)
बॉडीगार्ड (१४२)        हाऊसफुल २ (११४)
रा वन (११५)            बोलबच्चन (१०२)

Story img Loader