अभिनेता शाहिद कपूरची एकेकाळची गर्लफ्रेंड करिना कपूरने आपल्याला शाहिदच्या लग्नाची बातमी ऐकून आनंद झाल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर, मी शाहिदच्या लग्नालाही जाईन, असे करिनाने म्हटले आहे. शाहिद- करिना यांची प्रेमकहाणी २००७ मध्ये संपुष्टात आली होती. मात्र, आता शाहिदच्या लग्नाच्यानिमित्ताने दोघांमधील वितुष्ट संपण्याची चिन्हे दिसत आहेत. शाहिदने मला स्वत:हूनच त्याच्या लग्नाबद्दल सांगितले होते. शाहिदच्या लग्नाची बातमी माझ्यासाठी आनंददायी आहे. लग्न हे एक अतूट बंधन आहे, शाहिदला त्यासाठी माझ्या शुभेच्छा असल्याचे करिनाने वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. यावेळी तू शाहिदला काय सल्ला देशील, असा प्रश्नदेखील करिनाला विचारण्यात आला होता. मात्र, इतरांना सल्ला देणारी मी कोणीही नाही, असे करिनाने सांगितले. तू शाहिदच्या लग्नासाठी बोलावणे आल्यानंतर जाणार का, असा प्रश्न विचारल्यानंतर हो मी जाईन, असेही करिनाने म्हटले.
अलीकडच्या काळात बॉलीवूडमध्ये ऐन रंगात असताना विचका झालेल्या प्रेमप्रकरणांमध्ये शाहिद आणि करीना यांच्या लव्हस्टोरीचा उल्लेख केला जातो. तीन वर्षे एकमेकांशी प्रेमाच्या आणाभाका घेतल्यानंतर २००७ मध्ये यांच्यात अचानकपणे दुरावा निर्माण झाला होता. त्याची परिणती दोघांचे नाते तुटण्यात झाली होती. त्यानंतर करिना कपूर बॉलीवूडचा नवाब सैफअली खान याच्याशी विवाहबद्ध झाली होती. मात्र, त्यानंतरच्या काळातही शाहीद आणि करिनाच्या प्रेमकहाणीचे किस्से इंडस्ट्रीमध्ये वेळोवेळी चर्चिले जात होते.
या मुलाखतीदरम्यान, करिनाने शाहिदला ‘हैदर’साठी मिळालेल्या पुरस्कारांबद्दल आनंदी असल्याचे सांगितले. शाहिद उत्तम अभिनेता असून, त्याच्यासोबत पुन्हा-पुन्हा काम करायला आवडेल, अशी इच्छाही करिनाने व्यक्त केली. ब्रेकअपनंतर शाहिद-करिना पहिल्यांदाच ‘उडता पंजाब’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. अर्थात ‘उडता पंजाब’मध्ये दोघांची एकत्र जोडी नसून, आलिया भट चित्रपटात दिसणार आहे. शाहिद आणि मीरा जुलैच्या पहिल्या आठवड्यात विवाहबद्ध होणार आहेत. करिनानंतर शाहिदचे नाव प्रियांका चोप्रा, विद्या बालन, अनुष्का शर्मा, सोनाक्षी सिन्हा, नर्गिस फक्री, बिपाशा बासू, हुमा कुरेशीसोबत या अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते.

Story img Loader