अभिनेत्री करिना कपूर-खानला पती सैफ अली खानने हॉलिवूड चित्रपटात काम करावेसे वाटते. तिच्या मते सैफ हॉलिवूडपटांसाठी योग्य असा अभिनेता आहे. या विषयी बोलताना ती म्हणते, सैफमध्ये हॉलिवूड चित्रपटात काम करण्यासाठीचे आवश्यक ते सर्व गुण असल्याने तो तेथील चित्रपटात चांगली कामगिरी करू शकतो, असे मला वाटते. माझ्या मते तो तेथे योग्यप्रकारे सामावू शकतो… त्याच्याकडे व्यक्तीमत्व, गुण आणि अदा आहे. असे असले तरी करिनाला पाश्चिमात्य चित्रपटांमधून काम करण्याची इच्छा नाही. मी इथेच खूष असून, तिकडे जाण्याचा कोणताही विचार नसल्याचे ती म्हणते. चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणावर नवीन टॅलेन्ट येत असतानाही आजच्या तारखेला करिना ही सर्वात जास्त मागणी असलेली आघाडीची अभिनेत्री आहे. या विषयी आनंद व्यक्त करत ती म्हणते, हे सर्व तुमच्यातील अंगभूत गुणांवर अवलंबून असते. अभिनयाविषयी मला नेहमीच कमालीचे आकर्षण राहिले आहे. नवीन लोक येतच राहणार… परंतु ज्यांच्यात गुणवत्ता आहे तेच टिकून राहतील. माही गिल आणि हुमा कुरेशीचे काम करिनाला आवडते. ती म्हणते, येथे अनेक गुणवान अभिनेत्री असल्याचे माझे मानणे आहे. नवीन कलाकारसुद्धा चांगलं काम करत आहेत. छोट्या-छोट्या गावातून लोक चित्रपटसृष्टीत येत असून, हुमा कुरेशी व माही गिलसारख्या अभिनेत्री आपली छाप सोडतात. प्रत्येकजण चांगले काम करत आहे.
काही काळापासून चित्रपटसृष्टीत असलेली करीना स्वत:ला स्टार न समजता अभिनेत्री समजते. ती म्हणते, स्टार असणं म्हणजे काय असतं हे मला ठाऊक नाही. मी स्वत:कडे स्टार म्हणून कधीच पाहिलं नाही, लोकचं तसं समजतात. माझ्या मते मी एक अभिनेत्री आहे. मी एक सर्वसाधारण स्त्री आहे, जिला कुटुंब आणि मित्र परिवारासोबत वेळ घालवायला आवडते. जे करायला मला खूप आवडते.
मॅग्नम या जगप्रसिद्ध आइस्क्रिम ब्रॅण्डच्या उदघाटनाच्या वेळी ती म्हणाली, माझी भारताबाहेरील भेट मॅग्नमचा आइस्क्रिम बार खाल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही. भारतात या ब्रॅण्डचे प्रतिनिधीत्व करायला मिळाल्याने मी स्वत:ला सन्मनित समजत आहे. मी प्रतिनिधीत्व करत असलेला मॅग्नम हा २५ वा ब्रॅण्ड आहे. कोणत्याही ब्रॅण्डचे प्रतिनिधीत्व करताना तो ब्रॅण्ड कशा संदर्भात आहे आणि तो ग्राहकांना काय देतो, इत्यादी गोष्टींची मी खातरजमा करून घेते. मीसुद्धा अन्य सर्वसाधारण मुली प्रमाणेच आहे… आइस्क्रिममुळे माझ्या चेहऱ्यावरदेखील आनंदाचे भाव उमटतात. मॅग्नमचे भारतात प्रतिनिधीत्व स्वीकारल्याने करिना इव्हा मेंण्डस, इव्हा लाँगोरिया आणि लिव टायलर यांच्या पंगतीत जाऊन बसली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा