करीना कपूर खान आणि सैफ अली खानचा लेक तैमूर अगदी जन्मापासूनच चर्चेत आहे असं म्हणायला हरकत नाही. आई-वडिलांप्रमाणेच तैमूरचीही सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसते. कधी तो कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसतो तर कधी चक्क माझे फोटो काढू नका म्हणून छायाचित्रकारांना सांगतानाही दिसतो. अगदी लहान वयातच त्याला मिळालेली ही प्रसिद्धी तो अगदी एण्जॉय करतो. करीना-सैफला देखील आपल्या लेकाचं विशेष कौतुक आहे. वयाच्या ५व्या वर्षीच आपल्या आई-वडिलांना अभिमान वाटेल असं काम तैमूरने केलं आहे.
इतक्या लहान वयामध्ये विविध प्रकारचे खेळ तैमूर शिकत आहे. तो सध्या तायक्वांदोचे प्रशिक्षण घेत आहे. ज्या ट्रेनिंग सेंटरमध्ये तैमूर तायक्वांदो शिकत आहे तिथे सैफ-करीना पोहोचले होते. याचं कारणंही तितकंच खास होतं. कारण तैमुर शिकत असलेल्या ट्रेनिंग सेंटरमधून त्याला तायक्वांदोमध्ये पिवळा बेल्ट मिळाला आहे. याचदरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – Photos : लग्नाला पाच महिने पूर्ण होताच न्यूयॉर्कला पोहोचले विकी-कतरिना, रोमँटिक फोटो व्हायरल
या व्हायरल व्हिडीओमध्ये सैफ-करीना तैमूरचं कौतुक करताना दिसत आहेत. तर आपल्या मुलाची प्रगती पाहून दोघांना झालेला आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. तैमूरने सुद्धा ट्रेनिंग सेंटरमधून बाहेर येताच कॅमेऱ्यासमोर विविध पोझ दिल्या. त्याचबरोबर त्याची तायक्वांदोची प्रशिक्षिकाही त्याच्याबरोबर होती. सैफ-करीनासाठी हा क्षण खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा होता.
यावेळी करीनाने फिक्या निळ्या रंगाची पँट आणि गडद निळ्या रंगाचं शर्ट परिधान केलं होतं. यामध्ये ती अगदी परफेक्ट दिसत होती. तर सैफने पँट आणि पांढऱ्या रंगाचं टि-शर्ट परिधान केलं होतं. खरं तर इतर आई-वडिलांप्रमाणेच सैफ-करीनादेखील आपल्या मुलाचं कौतुक करायला नेहमीच तयार असतात. तसेच त्याच्याबरोबर त्याच्या शाळेतील देखील प्रत्येक कार्यक्रमाला दोघं हजर असतात. एकूणच काय तर सैफ-करीना आपल्या कामामध्ये कितीही व्यस्त असले तरी पालक म्हणून आपली असणारी जबाबदारी ते कधीच विसरत नाहीत.