बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीनाचे लाखो चाहते आहेत. करीनाने फेब्रुवारीत तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. तर तिच्या धाकट्या मुलाचे नाव जहांगीर असल्याचा खुलासा दोन महिन्यांपूर्वी झाला. त्यावरून तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. कोणातही भेदभाव न करण्याची शिकवण तिच्या मुलांना देणार असल्याचे करीना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली आहे. करीनाने हे वक्तव्य एलजीबीटीक्यू कम्युनिटी विषयी बोलताना केले आहे.
करीनाने नुकतीच ‘फिल्मफेअर’ला मुलाखत दिली. तिला कोणत्याही समाजातील भेदभाव आवडत नाही. ती सर्वांना समान मानण्याच्या विचारसरणीवर विश्वास ठेवते आणि तिच्या मुलांनीही यावर विश्वास ठेवावा अशी तिची इच्छा आहे. “मला त्यांना (एलजीबीटीक्यू कम्युनिटी) वेगळे म्हणणे देखील आवडत नाही. आपण एक आहोत. ‘ते वेगळे आहेत’ असे लोक का म्हणतात? नाही! आपल्या सगळ्यांचे हृदय, फुफ्फुसे सारखे आहेत, मग आपण त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीकोणातून का पाहतो? मला तेच वाटतं आणि मी नेहमी माझ्या मुलांना असाच विचार करायला सांगेन,” असे करीना म्हणाली.
आणखी वाचा : समीर वानखेडेंच्या करिअरमागे आहे ‘या’ जवळच्या व्यक्तीचा हात, पत्नी क्रांतीने केला खुलासा
करीना पुढे म्हणाली, “माझे तुमच्यावर प्रेम आहे. (एलजीबीटीक्यू कम्युनिटी)! तुम्ही नेहमीच मला भरभरून प्रेम दिले हे मला आवडते. मी आणि सैफ पारदर्शकपणे सगळ्याकडे पाहतो आणि जगभरात आमचे एलजीबीटीक्यू कम्युनिटीतले मित्र आहेत. आम्ही खुल्या मनाने आणि विचाराने जगणारे आहोत आणि अशा प्रकारे माझ्या मुलांनी विचार केला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आम्ही त्यांच्याशी एलजीबीटीक्यू कम्युनिटीशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करतो आणि मला वाटते की असेच असले पाहिजे. “
आणखी वाचा : अमिताभनं आता तरी निवृत्ती घ्यावी, सलीम खानांचा प्रेमळ सल्ला
करीना लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती आमिर खानसोबत दिसणार आहे. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे.