करणच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये नुकतीच करिना कपूर आणि प्रियांका चोप्राने उपस्थिती लावली. या शोदरम्यान करिनाला तिच्या मुलांविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची उत्तर देतांना करिनाने कुटुंबाबद्दल आतापर्यंत कधीही न ऐकलेल्या गोष्टी सांगितल्या. या शोदरम्यान करिनाने तिच्या सावत्र मुलीच्या म्हणजेच साराच्या पहिल्या भेटीविषयीच्या काही आठवणी शेअर केल्या.
खान कुटुंबामध्ये करिनाची सर्वात मोठी कोण चाहती असेल तर ती म्हणजे सारा. साराने अनेक वेळा तिच्या मुलाखतींमध्ये ती करिनाची चाहती असल्याचं म्हटलं आहे. करिनालादेखील याविषयी माहित आहे. त्यामुळेच साराच्या पहिल्या चित्रपटाच्यावेळी करिनाने तिला मदत केली होती. करिना साराची सावत्र आई असली तरी या दोघी मैत्रिणींप्रमाणे वावरत असतात. कॉफी विथ करणच्या सेटवर करिनाने या दोघींच्या नात्याविषयी चर्चा केली. त्यासोबतच त्यांची पहिली भेट कुठे आणि कशी झाली हेदेखील सांगितलं.

”कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असताना सारा तिच्या आईसोबत अमृता सिंहसोबत चित्रपटाच्या सेटवर आली होती. सारा लहान असल्यापासून माझी चाहती आहे. त्यामुळे माझी भेट घेण्यासाठी ती आली होती. या काळामध्ये कभी खुशी कभी गम चित्रपटातलं यू आर माय सोनिया हे गाणं विशेष गाजलं होतं. हे गाणं माझ्यावर आणि हृतिक रोशनवर चित्रीत करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या चित्रपटातील आऊटफिटमध्ये सारा मला भेटायला आली होती. हीच आमची पहिली भेट होती”.
सारानेदेखील एका कार्यक्रमामध्ये करिनासोबतच्या नात्याविषयी तिचं मत व्यक्त केलं होतं. करिना माझी सावत्र आई नाही तर चांगली मैत्रीण आहे असं म्हटलं होतं.

दरम्यान, ‘कॉफी विथ करण’च्या सेटवर करिनाने सारासोबतच तैमुरविषयीही चर्चा केल्याचं पाहायला मिळालं. बाजारामध्ये तैमुरसारखी दिसणारी बाहुली आल्यामुळे करिना नाराज असल्याचं तिने यावेळी सांगितलं.

 

Story img Loader