शाहीद कपूर आणि करीना कपूर ही बॉलीवूडमधली पडद्यावर आणि पडद्याबाहेरही लोकांची आवडती जोडी होती. त्यांच्या प्रेमाची नौका भर समुद्रात बुडाल्यानंतर शाहीद अजूनही वेगवेगळे किनारे शोधत फिरतो आहे. तर करीनाने सैफबरोबर संसार मांडून नवा अध्याय सुरू केला आहे. मात्र, त्यांचे प्रेमसंबंध इतक्या वाईट पद्धतीने बिघडले की त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या समोरासमोर येणेही सोडून दिले होते. त्यामुळे इतक्या वर्षांनी ते दोघे पुन्हा चित्रपटातून का होईना एकत्र येणार, असे कोणी शपथेवर सांगितले तरी इंडस्ट्रीतही कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, अभिषेक चौबे दिग्दर्शित ‘उडता पंजाब’ या चित्रपटातून ही कमाल साधली जाणार असल्याचे बोलले जाते.
करीना कपूर खानने विवाहानंतर अगदीच मोजक्या चित्रपटांना पसंती दिली आहे. त्यातही सलमान खान आणि अजय देवगण, रोहित शेट्टी ज्यांच्याशी तिचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, अशा लोकांचे चित्रपट सोडून बाकीच्यांना तिने अक्षरश: घरी परत पाठवले आहे. मात्र, ‘देढ इश्किया’ फे म दिग्दर्शक अभिषेक चौबेच्या चित्रपटासाठी तिने स्वत:हून तारखांची जुळवाजुळव सुरू के ली आहे. चौबेच्या आगामी ‘उडता पंजाब’ या चित्रपटात शाहीद कपूर मुख्य भूमिकेत आहे. तर शाहीदची नायिका म्हणून आलिया भट्टचे नाव निश्चित झाले आहे. या चित्रपटात आणखी एक भूमिका आहे आणि ती खास करीनासाठी ठेवण्यात आली आहे. करीनाने या चित्रपटासाठी होकार दिला असून सध्या तरी तिची तारखांची जुळवाजुळव सुरू आहे. तारखा निश्चित झाल्या तरच हे दोघे पुन्हा एकाच चित्रपटात दिसतील. ‘एकत्र’ दिसतील की नाही, याबद्दल अजून तरी साशंकता आहे.
करीना आणि शाहीदने याआधी ‘जब वुई मेट’, ‘फिदा’, ‘३६ चायना टाऊन’, ‘चुपचुपके’ आणि ‘मिलेंगे मिलेंगे’ असे चित्रपट केले आहेत. हे सगळे चित्रपट अर्थातच त्यांची प्रेमकथा बहरात असतानाचे आहेत. अपवाद फक्त ‘मिलेंगे मिलेंगे’ चा आहे. कारण, हा चित्रपट ते दोघे एकत्र असतानाच चित्रित झाला होता. मात्र, हा चित्रपट खूप दिवस रखडला आणि जेव्हा चित्रपटगृहात तो प्रदर्शित झाला तेव्हा या दोघांनी कधीही न भेटण्याचा निर्धार करीत आपले मार्ग वेगवेगळे केले होते. त्यामुळे ‘उडता पंजाब’ या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी नुसती एकत्र दिसली तरी ते नवलच ठरणार आहे!

Story img Loader