अलिकडेच मादाम तुसाँमधील अभिनेत्री करिना कपूरच्या मेणाच्या पुतळ्याला नव्याने साजशृंगार चढविण्यात आला. ‘रावन’ चित्रपटातील ‘छम्मक छल्लो’ या प्रसिद्ध गाण्यात करिनाने परिधान केलेली लाल रंगाची साडी या पुतळ्याला घालण्यात आली. याआधी या पुतळ्यावर ‘जब वुई मेट’ चित्रपटातील ‘मौजा ही मौजा’ गाण्यात करिनाने घातलेला काळ्या रंगाचा पोशाख चढविण्यात आला होता. पतीराज सैफ अली खानचा ४४ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी येथे आलेल्या करिनाने या नव्या अवतारातील आपल्या मेणाच्या पुतळ्याबरोबर छायाचित्र काढून घेण्यासाठी मादाम तुसाँ संग्रहालयाला भेट दिली. संग्रहालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संदेशात करिना म्हणते, ही साडी खूप छान आणि उठून दिसते. माझ्या मेणाच्या पुतळ्याचे डोळे हुबेहुब माझ्या डोळ्यांसारखे आहेत.

अमिताभ बच्चन, शाहरूख खान, ऐश्वर्या राय आणि हृतिक रोशन या बॉलिवूड कलाकारांचे मेणाचे पुतळेदेखील या संग्रहालयात ठेवण्यात आलेले आहेत. मादाम तुसाँ संग्रहालयातर्फे पुढच्या वर्षी अन्य एका बॉलिवूड अभिनेत्रीचा मेणाचा पुतळा उभारण्याची योजना असून, चाहत्यांच्या मतदानाद्वारे त्या नशिबवान अभिनेत्रीच्या नावाची निवड करण्यात येईल.

Story img Loader