बॉलीवूड बेगम करिना कपूर आणि सैफ अली खान हे ऑक्टोबर २०१२ला विवाहबद्ध झाले. त्यानंतर आता करिनाने आई होण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, पुढचे दोन-तीन वर्ष तरी मला मुल नको असल्याचे करिनाने म्हटले आहे.
बजरंगी भाईजानच्या यशाच्या आनंदात असलेली करिना म्हणाली की, सध्या माझ्या डोक्यात आई होण्याचा कोणताचं विचार नाही. याबाबत माझे विचारही स्पष्ट आहेत. मी कधीतरी आई होईन. पण ही ती वेळ नाही. व्यावसायिक चित्रपटांसह मनोरंजनात्मक चित्रपटांची निवड मी करते. मी अगदी तरुण वयात कामास सुरुवात केली. जेव्हा मी मागे वळून माझ्या कामाकडे बघते तेव्हा मला अभिमान वाटतो. ‘बेवफा’मध्ये अनिल कपूरच्या पत्नीची भूमिका साकारण्यापासून ते आता आर.बल्कीच्या चित्रपटात अर्जुन कपूरसह काम करणे असो हा माझ्यासाठी एक प्रवास आहे. अजूनही मी चित्रपटसृष्टीतील सर्व खान अभिनेत्यांसह काम करतेय.
कोणत्याच गोष्टीबद्दल मला असुरक्षित वाटत नाही. इतक्या वर्षांनंतरही मी अजून काम करतेय. माझं लग्न झालयं, मी स्वतंत्र आहे, याचा मला आनंद आहे. मला तरुण मुलींसाठी एक उदाहरण बनायचे आहे. जेणेकरून, त्याही लग्न आणि करिअर या दोघांची चांगली सांगड घालू शकतील, असे करिना म्हणाली.

Story img Loader