सैफ अली खानसोबत विवाहबद्ध झाल्यानंतर करिना कपूरचा ‘गोरी तेरे प्यार में’सारखा सुमार चित्रपट झळकला. ‘हिरोईन’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटानंतर तिची प्रमुख भूमिका असलेला एकमेव चित्रपट ‘गोरी तेरे प्यार में’ सुपरफ्लॉप ठरला. विवाह झाल्यानंतर प्रेक्षक अभिनेत्रीकडे पाठ फिरवतात असा कल नेहमीच दिसून आला आहे. त्यामुळेच कुठे एखादे गाणे कर किंवा विशेष पाहुणी कलाकार म्हणून झळकण्यावरच करिनाला लक्ष केंद्रित करावे लागले आहे. तिचा माजी प्रियकर हृतिक रोशनही घटस्फोटानंतर फारसा प्रकाशझोतात आलेला नाही. त्यातल्या त्यात क्रिश थ्री सुपरहीट झाल्यामुळे आपले वलय आणि लोकप्रियता राखण्यात मर्यादित स्वरूपात का होईना पण हृतिक रोशन यशस्वी ठरला आहे. परंतु, तसे पाहिले तर दोघांची नाव अलगद सहजपणे किनाऱ्याला लागतेय असे दिसत नाही. म्हणूनच आता म्हणे हे दोघे माजी प्रियकर-प्रेयसी पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर येणार अशी चर्चा रंगली आहे.
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आपला नवीन ऐतिहासिक सिनेमा ‘मोहंजोदडो’ तयार करणार असून यात हृतिक रोशनची नायिका म्हणून बेबो झळकण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. बेबोची क्रमांक एकची स्पर्धक अभिनेत्री प्रियांका चोप्रा हीसुद्धा आशुतोष गोवारीकरच्या चित्रपटातील भूमिका मिळविण्यासाठी प्रयत्नात होती असे समजते. परंतु, अखेरीस एक बडा चित्रपट मिळविण्यात बेबो यशस्वी ठरल्याची चर्चा चांगलीच रंगली असून अद्याप अधिकृत घोषणा व्हायची आहे. मुझसे दोस्ती करोगे, कभी खुशी कभी गम आणि मैं प्रेम की दिवानी हूँ अशा काही चित्रपटांतून हृतिक-करिना जोडी प्रेक्षकांसमोर आली होती. आता बऱ्याच कालावधीनंतर ही जोडी पुन्हा एकदा झळकण्याची शक्यता आहे.
प्रश्न असा आहे की, सैफशी लग्न केल्यानंतर एक तरी बिगबजेट, ऐतिहासिक विषयावरचा चित्रपट बेबोला मिळाला असला तरी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर असल्याने हा ‘मोहंजोदडो’ पडद्यावर यायला किती दिवस लागतील हे सांगणे मात्र अवघड आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा