करीना कपूर-खान ही अभिनेत्री बॉलीवूडमध्ये अनेकोंची आवडती अभिनेत्री आहे. एक सक्षम आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिचा लौकिक कायम राहिला आहे. खरे तर, करीनाने सैफशी विवाह झाल्यानंतर अनेक चांगले चित्रपट नाकारले. किंबहुना विवाहाआधीच चित्रपटांना आणि दिग्दर्शकांना नकारघंटा वाजवण्यासाठी तिने सुरुवात केली होती. विवाहानंतर तर करीनाने कोणते चित्रपट स्वीकारले यापेक्षाही तिने किती चित्रपट नाकारले याचीच जास्त चर्चा व्हायला लागली. सध्या अभिषेक चौबेच्या ‘उडता पंजाब’मध्ये वेगळ्या भूमिकेत दिसणाऱ्या करीनाने आजवर सर्वाधिक नकार ज्याच्या चित्रपटांना दिला तो दिग्दर्शक आहे संजय लीला भन्साळी..संजय लीला भन्साळींचा ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाची सुरुवात खुद्द संजयजींच्या मनात करीनापासूनच झाली होती. मस्तानीच्या भूमिकेत करीना आणि बाजीरावच्या भूमिकेत सलमान खान अशी त्यांच्या मनातील जोडी होती. मात्र, चित्रपट कागदावरून प्रत्यक्षात उतरेपर्यंत अनेक गोष्टी बदलल्या. करीना आणि सलमान ही दोन्ही नावे बाजूला पडली. पण, त्याआधीचा ‘रामलीला – गोलियों की रासलीला’ हाही भन्साळींचा चित्रपट करीनाने नाकारला होता. मात्र, ‘रामलीला’ चित्रपटाच्याही आधी संजय भन्साळींनी आपल्याला ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील भूमिका देऊ केली होती, असे गुपित करीनाने उघड केले आहे. संजय लीला भन्साळी आणि माझा बहुधा छत्तीसचा आकडा आहे, असे करीनाच गमतीने सांगते.
भन्साळींना नकार देण्याचे कोणतेही कारण माझ्याकडे नाही. ते खूप चांगले दिग्दर्शक आहेत आणि तरीही त्यांनी देऊ केलेला एकही चित्रपट मला आजतागायत स्वीकारता आलेला नाही, असे करीनाने सांगितले. मात्र, त्यांचे चित्रपट मी के ले नाहीत याबद्दल खंत वाटत नाही. ते चित्रपट माझ्यासाठी नव्हतेच, असे करीना म्हणते. संजय लीला भन्साळींचे चित्रपट आपल्याला खूप आवडतात. पण, तरीही त्यांचे चित्रपट करण्याचा योगच जुळून येत नाही. संजय आणि मी पूर्वजन्मी एकमेकांपासून दुरावलेले प्रियकर-प्रेयसी आहोत बहुधा. या जन्मात तरी एकत्र काम करण्याचा आमचा योग नाही. आमच्या पुढच्या जन्मात मात्र आम्ही दोघे एकत्र पडद्यावर धमाल उडवून देऊ, असे गमतीने म्हणणाऱ्या करीनाने आपल्याला भन्साळींबरोबर काम करायची खूप इच्छा असल्याचे सांगितले.

Story img Loader