विविध धाटणीच्या कथानकांना अतिशय प्रभावीपणे हाताळत काही काही अफलातून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्याच वाटेवर चालत आणखी एक चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार असून, या चित्रपटाच्या नावावरुन प्रेक्षकांच्या मनात प्रचंड कुतूहल पाहायला मिळत आहे. कारण या चित्रपटाचं नाव आहे, ‘रेडू’.

लँडमार्क फिल्मच्या विधी कासलीवाल प्रस्तूत आणि नवल फिल्म्सचे नवलकिशोर सारडा निर्मित, ब्लिंक मोशन पिक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने येत्या १८ मे रोजी प्रदर्शित होत असलेला, सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारप्राप्त ‘रेडू’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यातील ‘करकरता कावळो’ हे गाणं नुकतच लाँच करण्यात आलं असून, मालवणी भाषेचा गोडवा या गाण्यातून प्रेक्षकांची मनं जिंकतोय. या गाण्याचं लेखन आणि संगीत राज्य पुरस्कारप्राप्त विजेते विजय नारायण गवंडे यांचं असल्यामुळे, हे गाणं रसिकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी ठरत आहे. अमिता घुगरी आणि प्रवीण कुंवर या स्थानिक कलाकारांकडून हे गाणे गाऊन घेतलं असल्यामुळे, या गाण्यात कोकणची धमाल सिनेरसिकांना अनुभवता येत आहे.

ग्रामीण जीवनातील हलकेफुलके विनोद मांडणाऱ्या या चित्रपटात मराठी- मालवणी भाषेचा सर्वाधिक वापर करण्यात आला आहे. त्यामुळे निसर्गाने नटलेल्या कोकणी संस्कृतीशी जवळीक साधण्याची नामी संधी ‘रेडू’च्या निमित्ताने शहरी प्रेक्षकांना मिळणार आहे. शशांक शेंडे आणि छाया कदम यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात रेडिओची गमतीदार गोष्ट सांगण्यात आली आहे. ‘करकरता कावळो’ या गाण्यामध्येदेखील ही धमाल दिसत असून, सामान्य माणसाच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण या गाण्यात टिपले आहेत.

वाचा : UPSC results: मदरशातील शिक्षकाची यशोगाथा, जिंकली केंद्रीय लोकसेवा आयोगाची शर्यत

सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारप्राप्त सागर छाया वंजारी दिग्दर्शित आणि संकलित ‘रेडू’ या सिनेमाला नुकत्याच झालेल्या ५५ व्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळ्यात आणि दिल्लीतल्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब मिळाला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच प्रदर्शित होत असलेला हा ‘रेडू’ चांगलाच आवाज करणार, यात शंका नाही.