गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अन्नू कपूर अभिनित ‘हमारे बारह’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने बंदी घातली आहे. या चित्रपटामुळे सांप्रदायिक तणाव वाढू शकतो, असे सरकारचे म्हणणे आहे. यासाठी पुढील दोन आठवड्यापर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी असावी. त्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत चर्चा केली जाईल. कर्नाटक सिनेमा (नियमन) कायदा, १९६४ अंतर्गत हा निर्णय घेतला गेला आहे. काही अल्पसंख्याक संघटनांनी आणि शिष्टमंडळांनी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आक्षेप नोंदविला होता. या चित्रपटात अन्नू कपूर प्रमुख भूमिकेत असून त्यांच्याबरोबर मनोज जोशी, परितोष त्रिपाठी आणि पार्थ संथन असे इतर कलाकार आहेत.
दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानेही या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. मात्र प्रदर्शनाला दोन दिवस उरले असताना ही बंदी मागे घेण्यात आली. न्यायालयाने तीन सदस्यांची एक समिती स्थापन करण्याची सूचना दिली. ज्यामध्ये कमीत कमी एक सदस्य मुस्लीम असेल. या समितीने चित्रपट पाहून त्यावर आपला अहवाल द्यावा, त्यानंतरच चित्रपटाच्या प्रदर्शनावर निर्णय घेऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर अभिनेते आणि चित्रपटातील प्रमुख कलाकार अन्नू कपूर यांनी ३ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना ते म्हणाले, “आमचा आगामी चित्रपट ‘हमारे बारह’वरून वाद निर्माण झाला आहे. काही लोकांनी आमच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आम्हा कलाकारांनाही धमकी मिळाली आहे. आमचे निर्माते कमल चंद्रा, निर्माते रवी गुप्ता आणि इतर निर्मात्यांना शिरच्छेद करण्याची धमकी मिळाली आहे. आमचा हा चित्रपट ७ जून रोजी संपूर्ण देशात आणि इतर १५ देशांमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालावं अशी विनंती आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.”
‘हमारे बारह’ या सिनेमात वाढत्या लोकसंख्येवर भाष्य करण्यात आले आहे. भारतात अशाप्रकारे लोकसंख्येच्या विषयाला धर्माच्या आधारावर हात घातलेला नाही. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव ‘हम दो, हमारे बारह’ असे होते. मात्र त्यावर आक्षेप नोंदविल्यानंतर त्याचे नाव फक्त हमारे बारह असे ठेवण्यात आले. ७ जून रोजी चित्रपट इतरत्र प्रदर्शित झालेला आहे. अभिनेते मनोज जोशी यांनी सांगितले की, या चित्रपटातून कोणत्याही विशिष्ट धर्माला लक्ष्य केलेले नाही.
कथानक काय आहे?
चित्रपटाच्या ट्रेलरवरून समजते की, अन्नू कपूर यांनी हमारे बारह चित्रपटात मन्सूर अली खान नावाचे पात्र रंगवले आहे. मन्सूरची पहिली पत्नी बाळंतपणातच दगावते. तर दुसरी पत्नी सहाव्यांदा गर्भवती असताना डॉक्टर तिच्या जिवाचे बरे वाईट होऊ शकते, असे सांगतात. मात्र मन्सूर पत्नीचा गर्भपात करण्यास नकार देतात. यामुळे पहिल्या पत्नीची मोठी मुलगी सावत्र आईला वाचविण्यासाठी मन्सूरला न्यायालयात खेचते. न्यायालयाने सावत्र आईच्या गर्भपातास मंजूर द्यावी, यासाठी खटला दाखल होतो. या खटल्याच्या सुनावणीभोवती चित्रपटाचे कथानक रचलेले आहे.