जयपूर या ठिकाणी ३० जानेवारी ३ फेब्रुवारीपर्यंत जयपूर साहित्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पाच दिवसीय कार्यक्रमात विठ्ठल विठ्ठलचा गजर झाला आणि संदीप नारायण यांनी गायलेल्या कानडा राजा पंढरीचा या गाण्याला उभं राहून सगळ्या उपस्थितांनी अभिवादन केलं. या महोत्सवात ४७ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. ३१ नोबेल पुरस्कार विजेते आणि पुलित्झर पुरस्कार विजेते लेखकही या साहित्य महोत्सवात सहभागी झाले आहेत.
संदीप नारायण यांची मैफल, कानडा राजा गाणं आणि प्रेक्षक मंत्रमुग्ध
संदीप नारायण यांची मैफिल या साहित्य महोत्सवात आयोजित करण्यात आली होती. या मैफिलीत त्यांच्या बंदिशींमध्ये उपस्थित प्रेक्षक वर्ग स्वर्गीय सुखाचा आनंद घेत होते. या मैफिलीत संदीप नारायण यांनी ‘कानडा राजा पंढरीचा गाणं’ म्हटलं. कानडा राजा पंढरीचा हे मराठी गाणं म्हणताच उपस्थित रसिक प्रेक्षक विठ्ठल विठ्ठल हा गजर करु लागले आणि टाळ्या वाजवू लागले. विठ्ठल विठ्ठल हा गजर करत अनेक उपस्थितांनी संदीप नारायण यांच्या गायनाला अभिवादन दिलं. कानडा राजा पंढरीचा हे मराठी गाणं गाऊन नमस्काराचे हात जोडलेले संदीप नारायण आणि त्यांच्या समोर उभे असलेले प्रेक्षक या वातावरणामुळे जयपूर महोत्सवच विठ्ठल भक्तीत न्हाऊन निघाला.
कानडा राजा पंढरीचा हे गाणं गदिमांचं
कानडा राजा पंढरीचा हे गाणं गीतकार ग.दि. माडगूळकर यांनी लिहिलं आहे. झाला महार पंढरीनाथ या चित्रपटात हे गाणं आहे. पंडित वसंतराव देशपांडे आणि सुधीर फडके यांनी हे गाणं गायलं आहे तर या गाण्याला संगीत लाभलं आहे ते आपल्या सगळ्यांचे लाडके बाबूजी सुधीर फडके यांचं. आजही हे गाणं अनेक मैफिलींमधून सादर होत असतं. वसंतराव देशपांडेचे नातू राहुल देशपांडे आणि महेश काळे यांनीही अनेक मैफिलींमध्ये हे गाणं म्हटलं आहे. तीन-चार वर्षांपूर्वी आलेल्या ‘भाई’ या पु.ल. देशपांडेंवरच्या आयुष्यावरील चित्रपटातही या गाण्याचा समावेश करण्यात आला होता.
कानडा राजा पंढरीचा हे गाणं ५५ वर्षांपासून चर्चेत
कानडा राजा पंढरीचा हे गाणं गेल्या ५५ वर्षांपासून आपल्याला भुरळ घालतं आहे. कारण हे गाणं ‘झाला महार पंढरीनाथ’ या १९७० मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात होतं. तेव्हापासून विठ्ठलाच्या भक्तीत लीन होणाऱ्या भाविकांसाठी हे गाणं म्हणजे पर्वणीच ठरलं आहे. याच पर्वणीचा प्रत्यय जयपूर महोत्सवात रसिक प्रेक्षकांनी घेतला.
पंढरपूरच्या विठोबाला कानडा का म्हटलं गेलं याविषयीच्या काही अख्यायिका
पंढरपूरच्या विठोबाला कानडा राजा म्हटलं गेलं आहे. विठूरायाचं दर्शन राजा कृष्णदेवरायाने घेतलं त्याने विठ्ठलाचं हरण करुन कर्नाटकात नेलं, त्यानंतर विठ्ठलाची मूर्ती हंपीतल्या देवळात ठेवली. मात्र संत एकनाथांचे आजोबा भानुदास महाराज यांनी विठ्ठलाला पुन्हा पंढरपूरला आणलं. कर्नाटकात वास्तव्य केलं त्यामुळे त्याला कानडा राजा पंढरीचा असं म्हटलं जातं, अशी अख्यायिका आहे. कानडा हा शब्द ज्ञानेश्वरीतही आढळतो. कनाडा आणि कर्नाटकू अशी दोन विशेषणं संत ज्ञानेश्वरांनी विठ्ठलाला लावली आहेत. गदिमांनी गीतात कानडा राजा पंढरीचा असं वर्णन त्यांनी केल्याचं दिसतं. कानडा या शब्दाचा अर्थ गूढ, अगम्य असाही होतो. तर कर्नाटकू म्हणजे विविध प्रकारच्या लीला दाखवणारा असंही काही अभ्यासक सांगतात. हंपी या ठिकाणी विठ्ठल मंदिर आहे मात्र त्यात विठ्ठलाची मूर्ती नाही. ती विठ्ठलाची मूर्ती म्हणजेच पंढरपूरच्या मंदिरातील विठोबा. कर्नाटकात मूर्तीरुपाने राहिलेला विठ्ठल महाराष्ट्रात आल्याने त्याला कानडा म्हटलं गेलं आहे असंही काही अभ्यासकारांनी म्हटलं आहे.