अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा रंगत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि ‘पृथ्वीराज’ बाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली. येत्या ३ जूनला हा चित्रपट बॉक्सऑफिसवर दाखल होणार आहे. पण त्याचपूर्वी ‘पृथ्वीराज’ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी केली जात आहे. करणी सेनेने या चित्रपटाचं नाव बदलावं म्हणून यशराज फिल्समच्या सीईओशी चर्चा देखील केली आहे.
‘पृथ्वीराज’ चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी
करणी सेनेचे प्रवक्ते सुरजीत सिंग राठोड यांनी ईटाइम्सशी बोलताना सांगितले की, “आम्ही यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी यांची भेट घेतली आहे. आम्ही चित्रपटाचं नाव बदलू असं त्यांनी आम्हाला वचन दिलं आहे. आमची जी मागणी आहे ती पूर्ण करण्यास यशराज फिल्म्स तयार आहे.” पण याबाबत अजूनही यशराज फिल्म्सकडून कोणतंच स्पष्टीकरण आलेलं नाही.
आणखी वाचा – ‘धाकड’च्या अपयशानंतर कंगना रणौतने शेअर केली पोस्ट, ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाबाबत म्हणाली…
सुरजीत सिंग राठोड पुढे बोलताना म्हणाले की, “चित्रपटाचं नाव न बदलताच जर चित्रपट प्रदर्शित करण्यात आला तर राजस्थानमध्ये आम्ही हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. राजस्थानमधील चित्रपटगृहांना याबाबत आम्ही सांगितलं आहे. चित्रपटाचं नाव जर बदललं नाही तर राजस्थानमध्ये ‘पृथ्वीराज’ प्रदर्शित करण्यास आम्ही परवानगी देणार नाही.”
आणखी वाचा – Photos : वयाची ४०शी उलटली अन् लंडनमध्ये सुप्रसिद्ध गायिकेनं थाटामाटात केलं दुसरं लग्न, फोटो आले समोर
पण राजस्थानमधील चित्रपटगृहांचे मालक आणि वितरकांना ‘पृथ्वीराज’चं नाव बदलण्यात येणार असल्याची कोणतीच माहिती नाही. एकूणच काय तर ‘पृथ्वीराज’च्या प्रदर्शनाला आता विरोध करण्यात येत आहे. मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. त्याचबरोबरीने संजय दत्त, सोनू सुद, आशुतोष राणा देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.