विनोदावर जबरदस्त हुकुमत असलेले लेखक वसंत सबनीस यांचं ‘कार्टी काळजात घुसली’ हे नाटक पंचवीसेक वर्षांपूर्वी लिहिलेलं आणि याआधीही रंगभूमीवर येऊन गेलेलं असलं तरीही अभिनेते-निर्माते प्रशांत दामले यांना मध्यंतरीच्या खंडानंतर रंगमंचावर पुनरागमन करताना या नाटकाची भूल पडावी, यातच या rv09नाटकाचं मोठेपण सामावलं आहे. मराठी रंगभूमीचा आधार असलेल्या मध्यमवर्गीय प्रेक्षकांच्या भावनांना हात घालणारं, त्यांच्या मते ‘आदर्श’ असलेल्या मूल्यकल्पनांना कुरवाळणारं हे नाटक आहे. थोडक्यात, त्याकाळी ज्या मेलोड्रामावर व्यावसायिक रंगभूमीचा प्रेक्षक पोसला गेला होता, त्याला खतपाणी घालणारं असं हे नाटक. वरकरणी जरी ते बंडखोर वगैरे वाटत असलं, तरी अंतर्यामी भारतीय मूल्यकल्पनांचाच ते पुरस्कार करतं. पाश्चात्य नाटकावर आधारीत; परंतु मांडणीत देशी सत्त्व मिसळलेलं हे नाटक! साधारणत: या प्रकारची नाटकं कुठल्याही काळात सामान्य प्रेक्षकांना आवडतात. त्याचं कारण- आपण जसे प्रत्यक्षात नसतो, परंतु जसे असायला हवे होतो असं मनातून वाटत असतं, त्याचा प्रत्यय देणाऱ्या कलाकृती माणसाला सहसा आवडतात. म्हणजे बघा- आज आपण भलतेच व्यवहारवादी, स्वकेंद्री आणि अती(च!) व्यक्तिवादी झालेलो आहोत. परंतु आपलं असं असणं कुठंतरी आपल्याला कुरतडतही असतं. तो सुप्त अपराधगंड भारतीय मूल्यकल्पना कुरवाळणारी नाटकं/ सिनेमे पाहण्यानं, त्यांना मनापासून दाद देण्यानं निचरा होऊन बाहेर पडतो. आणि प्रेक्षागृहाबाहेर पडल्यावर पुनश्च आपण आपल्या व्यवहारी जगात परतायला आणि जसे आहोत तसेच वागायला मोकळे होतो. या अर्थानंही मेलोड्रामाची निकड प्रेक्षकांना भासत असावी. म्हणूनच अशा कलाकृतींना चांगला प्रतिसादही मिळत असावा. ‘कार्टी काळजात घुसली’च्या बाबतीतही हे जाणवतं. तथापि दिग्दर्शक मंगेश कदम यांनी ते आजचं वाटावं असे काही बदल नाटकात केले आहेत. हे नाटक लिहिलं गेलं त्यावेळचे नाटकातले काही संदर्भ आज कालबाह्य़ झाले आहेत. त्यात बदल करून त्यांनी ते वर्तमानाशी जोडून घेतले आहेत. पण माणसाची मूळ प्रवृत्ती  बदलत नाही. किंबहुना, ती अधिकच समकालीन झालेली जाणवते. म्हणूनच हे नाटक आजही प्रेक्षकाला बांधून ठेवतं.
संगीत दिग्दर्शक कालिदास कान्हेरे यांची एकवीस वर्षांची मुलगी कांचन त्यांना शोधायला म्हणून मुंबइला येते. अठरा वर्षांपूर्वी कान्हेरे सोलापुरातील आपली बायको आणि दोन लहानग्यांना सोडून घरातून चालते झाले आहेत. त्यानंतर त्यांचा पत्ता नाही.. काही संपर्क नाही. बायको-मुलांना ते सोडून गेले तेव्हा कांचन होती अवघी तीन वर्षांची. तर तिचा भाऊ बळवंत दीड वर्षांचा. साहजिकच बापाच्या घर सोडून जाण्यानं खडतर आणि पोरकं आयुष्य वाटय़ाला आलेल्या कांचनच्या मनात त्यांच्याबद्दल कमालीची अढी आहे. तशात आपल्या आजीकडून तिनं त्यांच्याबद्दल नाही नाही ते ऐकलेलं. घराचा एकमेव आधार असलेला पुरुष घर सोडून गेल्यावर जे त्या घराला भोगावं लागतं, ते कांचनच्या घरादारालाही चुकलं नव्हतं. त्यात तिची आई बिचारी साधी, सामान्य बाई. आपल्या परीनं ती घर सावरायचा प्रयत्न करते. हे सारं पाहत, अनुभवत वाढलेल्या कांचनला वडलांबद्दल घृणा, तिरस्कार न वाटला तरच नवल.  
मुंबईत महत्प्रयासानं ती कालिदास कान्हेरेंचा पत्ता शोधून काढते आणि त्यावर जाऊन धडकते. कान्हेरेंच्या घरातली यामिनी सरंजामे नावाची स्त्री तिचं स्वागत करते. आपण एक होतकरू अभिनेत्री असून हिंदी चित्रपटांत चमकण्यासाठी इथं आल्याचं ती यामिनीला सांगते. आणि कालिदास कान्हेरे हे आपले वडील असल्याचं सांगून ती त्यांच्या ‘पूर्वकर्तृत्वा’ची माहितीही तिला देते. यामिनी कालिदाससोबत ‘लिव्ह इन् पार्टनर’ म्हणून राहते. तिला पूर्वीच्या लग्नापासून दोन मुली आहेत. कालिदास आपल्याशी लग्न करतील आणि आपल्या मुलींना वडील मिळतील, या आशेवर ती आहे. कालिदास मात्र तिच्याशी लग्नानं बांधून घ्यायला राजी नाहीत. हिंदी चित्रपटांत यामिनी हेअर ड्रेसर म्हणून काम करते. साहजिकच तिचा आपल्याला चित्रपटात शिरकाव करायला उपयोग होईल म्हणून कांचन तिच्याशी मैत्रीचा हात पुढे करते. मात्र, कांचन ही कालिदासची मुलगी असल्याचं कळल्यानं यामिनीला आपल्या भवितव्याची चिंता भेडसावू लागते. आता शक्य तितक्या लवकर कालिदासना लग्नासाठी राजी करायला हवं, हे ती समजून चुकते.
कालिदास प्रथम कांचनला ओळखच दाखवत नाहीत. ती आपली मुलगी असल्याचंच नाकारतात. कांचन त्यांना त्याचे ठोस पुरावे दाखवते तेव्हा कुठं ती आपली मुलगी असल्याचं ते मान्य करतात. मात्र, तरीही आपण तिचं काही देणंघेणं लागत नाही, असं ते तिला स्वच्छपणे बजावतात. कांचनही मग इतक्या वर्षांचा साचलेला संताप, उद्विग्नता, त्यांच्याबद्दल वाटणारी घृणा त्यांचा जितका म्हणून पाणउतारा करता येईल तितका करून व्यक्त करते. कालिदास एका मर्यादेपर्यंत तिचं ऐकून घेतात, परंतु अती झाल्यावर मात्र तिला ‘चालती हो’ म्हणून सांगून बाहेरचा रस्ता दाखवतात. आपला तिच्याशी काहीएक संबंध नाही, असं ठणकावून सांगतात. तिचे आरोप फेटाळून लावतात. ती जायला निघते तेव्हा मात्र ते ‘आल्यासारखी दोन-चार दिवस राहा आणि मग जा,’ असं तिला सांगतात. कांचनही घर सोडून गेल्यानंतरचं त्यांचं आयुष्य जाणून घेण्याच्या उत्सुकतेपायी तिथं राहते. परंतु जमेल तेव्हा टोमणे मारायचं, पदोपदी त्यांचा अपमान करायचं मात्र सोडत नाही. कालिदासही तिला जशास तसं फटकारतात. आपण का घर सोडलं, हे एका क्षणी तिला सांगूनही टाकतात. तिला त्यांचं कारण पटत नाही. कारण त्यांच्या त्या निर्णयानं तिच्या अवघ्या घरादाराची फरफट झालेली असते.
त्यांच्यातलं वाक्युद्ध आणि तिचं बापाला सतत बोचकारणं सुरूच राहतं. चित्रपटात ब्रेक मिळवण्यासाठी तिचं रात्री-बेरात्री घराबाहेर जाणं, तिचा उथळ, उच्छृंखल स्वभाव, कसलाही पाचपोच नसलेलं वागणं- हे सारं कालिदासना असह्य़ होतं. बेचैन करतं. तरी ते तिला समजवायचा खूप प्रयत्न करतात. परंतु कांचन त्यांच्या सांगण्याला भीक घालत नाही. तिला हवं तसंच वागत राहते..
पुढं काय होतं, हे इथं सांगणं योग्य नाही. त्यासाठी नाटक पाहणंच उचित.
वसंत सबनीस यांनी दुरावलेल्या बाप-लेकीची ही गोष्ट खुमासदार शैलीत मांडली आहे. परंतु हे करताना पात्रांच्या पाश्र्वभूमीकडे मात्र त्यांचं अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. कालिदास कान्हेरेंचा भूत व वर्तमान काळ नाटकात नीटसा येत नाही. त्यामुळे त्यांच्या सद्य:वर्तनाशीही त्याचा सांधा जुळत नाही. किंबहुना, ते ज्या तऱ्हेनं यामिनीशी वागतात, त्यातून त्यांची भावनाशून्यताच दिसून येते. त्यांच्या स्त्रियांबद्दलच्या पूर्वानुभवांतून ती आली आहे असं गृहीत धरलं तरी नंतरही त्यांना त्याबद्दल कधी पश्चात्ताप झालेला आढळत नाही. त्यामुळे कांचनमध्ये त्यांचं हळूहळू गुंतत जाणंही तसं सहज स्वीकारार्ह वाटत नाही. तीच गोष्ट कांचनचीही. तिचं वागणं-बोलणं हे तिचं वय, तिच्यावरचे संस्कार आणि तिची शैक्षणिक पाश्र्वभूमी यांच्याशी फटकून वाटतं. (जरी या वागण्यामागे तिचा काहीएक हेतू असला, तरीही!) यातलं नंदकुमार हे पात्र तर लेखकाच्या सोयीसाठीच निर्माण केलं गेलं आहे. ती संहितेची गरज खचितच नाही. कालिदास आणि कांचन ही प्रमुख पात्रं वगळता अन्य दोन पात्रं ही तशी शेंडाबुडखा नसलेलीच आहेत. दिग्दर्शक मंगेश कदम यांनी हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणताना कालबाह्य़ झालेले काही संदर्भ बदलले असले तरी पात्रांच्या मानसिकतेत मात्र काळाचं प्रतिबिंब उमटताना दिसत नाही. त्यासाठी कदाचित संपूर्ण नाटकाचंच पुनर्लेखन करावं लागलं असतं, ही त्यांची अडचण असावी. असो. या नाटकाकडे तत्कालीन (लेखन)काळाचं अपत्य म्हणून पाहिल्यास मात्र या गोष्टी खटकत नाहीत. ‘कार्टी..’कडून वर्तमान संवेदनांची अपेक्षा न ठेवता पाहिल्यास निश्चितपणे ते रंजन करतं. बाप-लेकीतला निकराचा संघर्ष, त्यांचे परस्परांवरील कुरघोडीचे प्रयत्न आणि त्यातून घडणारे दंभस्फोट तसंच अलवारपणे बदलत जाणारं त्यांच्यातलं नातं प्रेक्षकांना जागीच खिळवून ठेवतं. दिग्दर्शक मंगेश कदम यांनीही त्यावरच भर दिला आहे. उभयतांमधल्या चकमकी आणि त्यातूनच त्यांच्यात कळत-नकळत निर्माण होत गेलेले बंध त्यांनी छोटय़ा छोटय़ा प्रसंगांतून आणि कलाकारांच्या अभिव्यक्तीतून अधिक गहिरे करत नेले आहेत. त्यामुळे नाटकाच्या उत्कर्षबिंदूप्रत येताना प्रेक्षक त्यात गुंगून जातो.. गुंतून पडतो.
मात्र बाप-लेकीमधलं नातं हळूहळू मार्गी लागताना दिसत असलं तरीही कालिदासच्या घराची सूत्रं अद्याप कांचनच्या हाती आली नसताना तिनं (दुसऱ्या अंकात) कालिदासच्या घराचं रंगरूप पालटल्याचं पाहायला मिळतं. हे कसं काय? दिग्दर्शक आणि नेपथ्यकार प्रदीप पाटील यांनी संहितेचा खोलात जाऊन विचार न केल्याचं हे निदर्शक आहे. शेवटच्या दृश्यात नंदूसोबत कांचननं घरी परतणं, हे तिनं नंतर केलेल्या खुलाशाशी मेळ खात नाही. अशोक पत्की यांचं संगीत नाटय़पूर्णतेचा आलेख उत्तरोत्तर वर नेतं. किशोर इंगळे यांची प्रकाशयोजना उभयतांतले तणावाचे तसंच भावपूर्ण क्षण गडद करते.
प्रशांत दामले यांनी ‘आम्ही दोघं राजा-राणी’नंतर बऱ्याच वर्षांनी आपली विनोदी नटाची प्रतिमा बाजूस सारत आपल्यातल्या सशक्त अभिनेत्याचं दर्शन यात घडवलं आहे. कालिदासचं बेछूट, बेदरकार आयुष्य, त्याबद्दल त्यांना अजिबात न वाटणारी खंत एकीकडे, तर दुसरीकडे आपण जिला तान्ह्य़ा वयात दूर लोटून अक्षम्य अन्याय केला, त्या मुलीच्या खडसावून जाब विचारण्यानं आलेला अपराधभाव मनाशी वागवत तिच्यासमोर पडतं घेणारा बाप- या दोन ध्रुवांमध्ये आंदोळणारे कालिदास कान्हेरे संयत अभिनयातून प्रशांत दामले यांनी मूर्तिमंत उभे केले आहेत. त्यांच्या आत घट्ट रुतलेला विनोदी नट मधूनच डोकं वर काढायचा प्रयत्न करतो; परंतु निकरानं ते त्याच्यावर काबू ठेवतात. त्यांचा हा संयम दाद देण्याजोगाच. भावनिकदृष्टय़ा सतत दोन पातळ्यांवर कसरत करताना त्यांची होणारी कुचंबणा, घालमेल, मुलीच्या काळजीपोटी अस्वस्थ होणारा त्यांच्यातला बाप आणि तिच्या आडमुठय़ा वागण्यानं संत्रस्त होऊनही अपराधगंडाने आलेल्या हतबलतेमुळे तिच्या बाबतीत काही करू न धजणं- यातली विकलता त्यांनी अत्यंत सूक्ष्मपणे दाखवली आहे. आजवरच्या त्यांच्या कारकीर्दीतील ही एक निश्चितच संस्मरणीय भूमिका होय.
आपली जबाबदारी टाकून पळून जाऊन घरादाराला पोरकं करणाऱ्या बापाबद्दलचा कांचनचा तडतडणारा संताप, चीड आणि उद्वेग त्यांच्यावर सतत शाब्दिक वार करत, त्यांना आपल्या वागण्या-बोलण्यातून हेतुत: डिवचत तेजश्री प्रधान यांनी मूर्त केला आहे. पण हे करत असताना संवादोच्चारातील आरोह-अवरोह सांभाळण्याची गरज होती. ती त्यांना सांभाळणं जमलेलं नाही. यामिनी झालेल्या नीता पेंडसे यांनी आपलं काम चोख केलं आहे. नंदकुमारच्या भूमिकेत पराग डांगे यांना काहीच वाव नव्हता.
एकुणात, संहितेतल्या त्रुटी व उणिवांकडे दुर्लक्ष करून, नाटकाचा लेखनकाळ ध्यानी ठेवून ‘कार्टी..’ पाहिल्यास एक छान, रंजक मेलोड्रामा पाहिल्याचं समाधान नक्कीच प्रेक्षकांच्या पदरी पडतं.

Marathi Actress Praises Sangeet Manapman Movie
“तुम्ही South च्या बाहुबलीचं कौतुक असेल तर…”, सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ पाहून मराठी अभिनेत्री भारावली, प्रेक्षकांना म्हणाली…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
aishwarya narkar dances on 56 years old bollywood song kajra mohabbat wala
“कजरा मोहब्बत वाला…”, ५६ वर्षे जुन्या गाण्यावर ऐश्वर्या नारकरांचा सुंदर डान्स! सोबतीला आहे ‘ही’ अभिनेत्री, कमेंट्सचा पाऊस
Story img Loader