राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांचा सुपरहिट चित्रपट ‘आशिकी’ १९९० मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील गाणी खूप लोकप्रिय झाली होती. आशिकी चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले होते. टी सीरिजने चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यानंतर २०१३ मध्ये मोहित सुरी दिग्दर्शित ‘आशिकी २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांची जोडी होती. हा चित्रपट देखील ब्लॉकबास्टर ठरला. आता या फ्रेन्चायझीमधील तिसरा भाग ‘आशिकी ३’ येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
टी- सीरिजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि निर्माते भूषण कुमार यांनी ‘आशिकी ३’ची घोषणा केली आहे. ‘आम्हाला कळविण्यास आनंद होत आहे की, आम्ही ‘आशिकी’ फ्रेन्चायझीचा तिसरा भाग आशिकी ३ घेऊन येत आहोत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासू करणार असून कार्तिक आर्यन यामध्ये मुख्य पात्र साकारणार आहे.’ यावेळी निर्माते मुकेश भट्ट यांनी १९९० च्या आशिकी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीचा एक किस्सा सांगितला. ‘आशिकीच्या प्रदर्शनाच्या एक दिवसआधी स्व. गुलशनजी (गुलशन कुमार) खूप चिंतेत होते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या चित्रपटाने इतिहास घडवला.’ असे मुकेश भट्ट म्हणाले.
आणखी वाचा- “मी काही तज्ञ नाही पण…” बॉलिवूड चित्रपटांच्या अपयशावर स्पष्टच बोलल्या पल्लवी जोशी
‘आशिकी ३’मध्ये कार्तिक आर्यनची वर्णी लागल्यानंतर त्याने ‘स्वप्न सत्यात उतरले..’ अशी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘मी लहान असताना अनेकदा ‘आशिकी’ चित्रपट पाहिला होता. आणि आता मी ‘आशिकी ३’मध्ये काम करणार आहे. हे एखाद्या स्वप्नाप्रमाणे आहे. मला दिलेल्या संधीबद्दल मी चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार आणि मुकेश भट्ट यांचे आभार मानतो. मी अनुराग सरांच्या कामाचा मोठा चाहता आहे. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.’ दिग्दर्शक अनुराग बासू यांनीही या चित्रपटासंबंधित माहिती दिली. ‘आशिकी फ्रेन्चायझी पुढे नेण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करणार आहोत. या निमित्ताने मी कार्तिकसोबत पहिल्यांदा काम करणार आहे. तो खूप मेहनती आहे. त्याची कामाप्रतीची निष्ठा मी जाणून आहे.’ असे म्हणत त्यांनी कार्तिकची स्तुती केली आहे.
अभिनेता कार्तिक आर्यन सध्या चर्चेत आहे. या वर्षी प्रदर्शित झालेला त्याचा ‘भूलभुलैय्या २’ हा चित्रपट खूप चालला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. अक्षय कुमारच्या ‘भूलभुलैय्या’ चित्रपटाच्या सिक्कलमध्ये, ‘भूलभुलैय्या २’ मध्ये प्रमुख पात्र त्याच ताकदीने साकारल्यामुळे कार्तिकचे सर्वत्र कौतुक झाले. कार्तिक आर्यन सध्या त्याच्या ‘शहजादा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे.