कार्तिक आर्यन आणि क्रिती सनॉन यांचा ‘लुकाछुपी’ हा चित्रपट महिन्याभरापूर्वी प्रदर्शित झाला. लिव्ह इन रिलेशनशिप आणि त्यातून उडणारी धम्माल सांगणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच गाजला. मात्र या चित्रपटाच्या यशाचं श्रेय केवळ कार्तिकलाच दिल्यानं क्रिती नाराज झाली आहे.

चित्रपटात मुख्य अभिनेत्यासोबतच मुख्य अभिनेत्रीही तेवढीच मेहनत घेते. या चित्रपटाची संपूर्ण जबाबदारी आम्हा दोघांच्या खांद्यावर होती मग यशाचं श्रेय केवळ कार्तिकलाच का दिलं जातंय असा सवाल क्रितीनं एका मुलाखतीत विचारला आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं क्रिती आणि कार्तिक पहिल्यांदाच एकत्र काम केलं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ९२.०५ कोटींची कमाई केली आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटानं ५३.७० कोटींची विक्रमी कमाई केली होती. मात्र चित्रपटाच्या यशाचं श्रेय हे केवळ कार्तिकला दिलं गेल्यानं क्रिती नाराज आहे.

त्याचप्रमाणे क्रितीनं तिला मिळणाऱ्या भूमिकांवरूनही नाराजी दर्शवली होती. चित्रपटात मला अनेकदा छोट्या शहरातील मुलीची भूमिकाच वाट्याला येत आहे. चांगल्या भूमिका मला कोणीही देत नाही अशी नाराजीही तिनं बोलून दाखवली होती. क्रिती सध्या आशुतोष गोवारिकर यांच्या ‘पानिपत’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तर कार्तिक हा इम्जिआज अलीच्या आगामी चित्रपटात व्यग्र आहे. हा चित्रपट ‘लव्ह आज कल’चा सीक्वल असणार अशी चर्चा आहे.

Story img Loader