बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाचं यश साजरं करत आहे. एकीकडे बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटत असताना कार्तिकचा चित्रपट मात्र तुफान चालला. अशात आता आणखी एका कारणानं कार्तिक आर्यन सोशल मीडियावर चर्चेत आहे. कार्तिक आणि करण जोहर यांच्यातील वादानंतर आता या दोघांचा धम्माल मस्ती करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मागच्या वर्षी या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर करणने कार्तिकला त्याच्या ‘दोस्ताना २’ चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. पण आता या दोघांमध्ये पुन्हा मैत्री झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मागच्या वर्षी करण जोहर आणि कार्तिक आर्यन हा वाद चांगलाच गाजला होता. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शननं तर सोशल मीडियावर एक पोस्ट करत कार्तिक आर्यनला चित्रपटातून बाहेर केल्याचं सांगितलं होतं. यावेळी त्यांनी कार्तिक त्याच्या कामाबाबत गंभीर नाही तसेच तो बेजबाबदार आहे असं कारणही दिलं होतं. अर्थात यानंतर करण जोहरवर बरीच टीका झाली होती. कार्तिक आर्यनला सुशांतसिंह राजपूतसारखी वागणूक दिली जातेय असंही म्हटलं होतं. पण आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कार्तिक आणि करण एकमेकांसोबत गप्पा मारताना आणि धम्माल मस्ती करताना दिसत आहेत.
आणखी वाचा- नागा चैतन्याच्या अफेअर्सच्या चर्चांवर पूर्वश्रमीची पत्नी सामंथाची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाली…
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये कार्तिक आणि करण एका इव्हेंटमध्ये एकत्र एकाच टेबलवर बसलेले पाहायला मिळत आहेत. तसेत हे दोघंही एकमेकांशी गप्पा मारताना आणि खळखळून हसताना दिसत आहेत. काही वेळानं वरुण धवन त्यांच्याजवळ येतो आणि दोघांनाही डान्स करण्यासाठी मंचावर घेऊन जाताना दिसत आहेत. तिथेही हे दोघं धम्माल मस्ती करताना दिसत आहे. या दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल झालेला दिसत आहे.
दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कार्तिक आणि करण यांच्यातील संबंध आता सुधारले असून त्यांच्यात सर्व काही ठीक असल्याचा अंदाज लावला जात आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत कार्तिक आर्यननं करण जोहरसोबतच्या वादावर प्रतिक्रिया दिली होती. त्याला, ‘तुला चित्रपटसृष्टीची कौटुंबिक पार्श्वभूमी नसल्यानं इंडस्ट्रीमधील लोकांशी वाद झाल्यानंतर त्याची मोठी किंमत चुकवावी लागली का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावर कार्तिकनं, “सध्या मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे असं उत्तर दिलं होतं.”