बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. अभिनयासोबतच कार्तिकच्या पर्सनॅलिटीचेही असंख्य चाहते आहेत. अनेकदा कार्तिकला भेटण्यासाठी हे चाहते आपल्या मर्यादा पार करताना दिसतात. आता तर दोन मुली कार्तिक आर्यनला भेटण्यासाठी त्याच्या घरापर्यंत पोहोचल्या. सध्या सोशल मीडियावर या दोन मुलींचा व्हिडीओ बराच व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता ट्विटरवरही कार्तिकचं नाव ट्रेंड होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दोन मुली कार्तिक आर्यनच्या बिल्डिंगखाली उभ्या राहून जोर- जोरात ओरडताना दिसत आहेत. ‘कार्तिक प्लिज बाहेर ये…’ असं म्हणत या मुली कार्तिकला भेटण्यासाठी विनंती करताना दिसत आहेत. पण कदाचित कार्तिक त्यावेळी घरी नव्हता. त्यामुळे त्या मुलींना कार्तिकला भेटता आलं नाही. पण ट्विटरवर मात्र हा व्हिडीओ ट्रेंड होताना दिसत आहे.
कार्तिक आर्यनच्या फॅन पेजवरून तसेच अनेक चाहत्यांकडून या मुलींचा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. अनेकांनी कार्तिकला आपल्या ट्वीटमध्ये टॅग करत त्या मुलींना भेटण्याची विनंती केली आहे. हा व्हिडीओ ज्याप्रकारे व्हायरल झाला आहे त्यावरून कार्तिकचा किती मोठा चाहता वर्ग आहे हे दिसून येतं.
अलिकडेच एका मुलाखतीत कार्तिकनं त्याच्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या नकारात्मक बातम्यांवर भाष्य केलं होतं. या मुलाखतीत कार्तिक म्हणाला, ‘जेव्हा सुरुवातीला मी स्वतःबद्दल नकारात्मक किंवा वाईट लिहिलेलं पाहत असे तेव्हा मला दुःख होत असे. पण आता मला हे सर्व वाचल्यावर हसू येतं.’ कार्तिकच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याचा ‘धमाका’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता आगामी काळात त्याच्याकडे ‘फ्रेडी’, ‘कॅप्टन इंडिया’, ‘भूल भुलैया २’, ‘शहजादा’ हे चित्रपट आहेत.