अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याचा चित्रपट ‘भूल भुलैय्या २’मुळे चर्चेत आहे. कियारा आडवणी, तब्बू आणि कार्तिक आर्यन यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच आता कार्तिक आर्यननं एका मुलाखतीत सारा अली खान आणि त्याच्या नात्यावर मौन सोडलं आहे. मागच्या २ वर्षांपासून कार्तिक आणि साराच्या चाहत्यांना ज्याची उत्सुकता होती त्याचं उत्तर अखेर कार्तिकनं या मुलाखतीत दिलं आहे.
सारा अली खाननं बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच वडील सैफ अली खानसोबत करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. याच शोमध्ये तिनं कार्तिक आर्यन तिला आवडत असल्याचं सांगितलं होतं आणि त्याला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर या दोघांनी इम्तियाज अली यांच्या ‘लव्ह आजकल २’ चित्रपटात काम केलं होतं आणि त्याच वेळी दोघांच्या लिंकअपच्या चर्चांना उधाणही आलं होतं. दोघांचे प्रमोशनच्या वेळचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
अर्थात नंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आणि फ्लॉप ठरला. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना फारशी आवडली नाही. चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर सारा आणि कार्तिकनं एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो देखील केलं. दोघंही पुन्हा कधीच एकत्र दिसले नाहीत किंवा त्यांनी त्यांच्या नात्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणं नेहमीच टाळलं. पण आता मात्र कार्तिकनं पहिल्यांदाच या नात्यावर भाष्य केलं आहे.
‘भूल भुलैय्या २’च्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत जेव्हा कार्तिकला विचारण्यात आलं की, ‘सारासोबतचं नातं हे त्यावेळी फक्त चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग होतं का?’ त्यावर कार्तिक म्हणाला, “नाही. त्यावेळी सगळ्याच गोष्टी प्रमोशनचा भाग नव्हत्या. आम्ही देखील माणसं आहोत. या विषयावर मी फक्त एवढंच सांगेन की, प्रत्येक गोष्ट प्रमोशनल नसते.”
आणखी वाचा- ‘…अन् बाकी सगळे कोमात’ वल्ली आणि माई मावशीचा धम्माल व्हिडीओ पाहिलात का?
कार्तिक आर्यनच्या कामाबद्दल बोलायचं तर तो आगामी काळात त्याच्याकडे ‘शहजादा’ आणि ‘कॅप्टन इंडिया’ हे दोन चित्रपट आहेत. तर सारा अली खान विकी कौशलसोबतच्या चित्रपटात दिसणार आहे. ज्याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. याशिवाय विक्रांत मेस्सीसोबत ती ‘गॅस लाइट’ या चित्रपटातही दिसणार आहे.