बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्यामुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. सध्या कार्तिक त्याच्या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे. अभिनयाची कोणतीही कौटुंबीक पार्श्वभूमी नसताना बॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेल्या कार्तिकनं त्याच्या कुटुंबीयांबद्दल आणि त्याच्या प्रसिद्धीबद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे.
सध्या कार्तिक आर्यन ‘भूल भुलैय्या २’च्या प्रमाोशनमध्ये बिझी आहे. या दरम्यान ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत कार्तिकनं त्याच्या खासगी आयुष्याबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या. या मुलाखतीत त्याला, ‘तुझ्या स्टारडमचा तुझं कुटुंब, मित्रपरिवार आणि एकंदर खासगी आयुष्यावर काय परिणाम झाला?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना कार्तिकनं फारच मजेदार उत्तर दिलं. तो म्हणाला, “माझे कुटुंबीय आणि मित्रांनी मला बॉयकॉट केलंय. आता त्यांनी माझ्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे.”
कार्तिक पुढे म्हणाला, “माझ्या स्टारडममुळे खरंच माझे कुटुंबीय आणि मित्र देखील कंटाळले आहे. त्यांना याचा त्रास होतो. कारण जर आम्ही कुठे फिरायला किंवा डिनर करायला जरी गेलो तरी तिथे माझे चाहते येतात आणि सेल्फी किंवा फोटोसाठी आग्रह करतात. त्यांना मी टाळू शकत नाही आणि यात आमचा अर्धा वेळ निघून जातो. आम्हाला हवा असलेला एकांत किंवा फॅमिली टाइम त्या ठिकाणी अजिबात मिळत नाही. चाहत्यांना ही गोष्ट माहीत नसते की माझ्यासोबत असणाऱ्या लोकांना याचा त्रास होतोय. त्यामुळे याचा दोष त्यांनाही देणं चुकीचं आहे. त्यामुळे आता माझे मित्र किंवा कुटुंबीय माझ्यासोबत कुठेही येत नाहीत किंवा त्यांच्या प्लॅनमध्ये मला सहभागी करुन घेत नाही. त्यांनी मला त्यांच्यातून वगळून टाकलंय.”
दरम्यान सध्या कार्तिक आर्यनचा आगमी चित्रपट ‘भूल भुलैय्या २’ बराच चर्चेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केलं आहे. याआधी २००७ साली प्रियदर्शनचा ‘भूल भुलैय्या’ प्रदर्शित झाला. ज्यात अक्षय कुमार, विद्या बालन यांसारखे कलाकार होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. आता कार्तिक आर्यनच्या चित्रपटाबाबत बोलायचं तर, या चित्रपटात कियारा आडवाणी, तब्बू, संजय मिश्रा, राजपाल यादव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या २० मे दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.