रवींद्र पाथरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काही वर्षांपूर्वी ‘करून गेलो गाव’ हे राजेश देशपांडे लिखित-दिग्दर्शित नाटक येऊन गेलं होतं. तेव्हा ते मालवणी ‘वस्त्रहरण’ची कॉपी असल्यासारखंच सादर झालं होतं. परंतु अलीकडेच सादर झालेलं हेच नाटक वेगळ्या ढंगात, वेगळ्या रंगात सादर झालं आहे. म्हणजे पार्श्वभूमी गावचीच, पण संपूर्ण संहिता बदललेली. यडगाव बुद्रुक गावाला तंटामुक्त गावाचं पारितोषिक मिळाल्यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गावाचा गौरव होणार असतो. स्थानिक आमदार त्यानिमित्ताने बिजली या लावणी नृत्यांगनेचा कार्यक्रम ठेवायचा बेत आखतात. तर गावकरी गावचं नाटक ठेवण्याचा आग्रह धरतात. पण आमदार मतकर गावाला आव्हान देतात.. नाटक कसं होतं तेच बघतो. सरपंचांसह गावकरी हे आव्हान स्वीकारतात.

आणि सुरू होते धमाल जुगलबंदी.

गावातले मास्तरच नाटक लिहिणार आणि बसवणार असतात. पण गावातील एक-एक नग असलेल्या नट मंडळींना घेऊन नाटक करायचं तर फेफरं यायची पाळी मास्तरांवर येते. तशात आमदार मतकर बिजलीकरवी त्यात बिब्बा घालायचा प्रयत्न करतात. बिजली नाटकातील स्त्रीपात्र करणाऱ्या नटालाच नादी लावून नाटक पाडायचा प्रयत्न करते. पण वेळीच याची खबर मिळून हे संकट टळतं. बिजलीला गावकऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची कल्पना येते. ती त्यांना मदत करण्याचं ठरवते. पण आमदार तिला कोंडून ठेवून तिची नाकेबंदी करतो. गावकरी संगनमताने मास्तरांच्या करवी तिची सुटका करवतात. आणि अखेरीस गावाचं नाटक तंटामुक्ती पुरस्कार सोहळ्यात सादर होतंच होतं.

वरकरणी असं हे साधंसुधं कथानक असलं तरी त्यात इम्प्रोव्हायझेशन तंत्रानं खूप धमाले धमाल घडते. इरसाल सरपंच, त्यांची तितकीच खटनट बायको काकू, धांदरट व डोकॅलिटी असलेले मास्तर, आंधळा धृतराष्ट्र, आगरी नट, बुटबैंगन बोंडक्या, छपरी सलमान, स्त्रीपार्टी नट शांत्या, छम्मकछल्लू बिजली, बेरकी आमदार मतकर अशी सगळी पोचलेली पात्रं यात भरलेली आहेत. त्यांच्यातील नाना प्रसंगांतून हे प्रसंगनिष्ठ नाटक घडत, खुलत, बहरत जातं. गावातली ही इरसाल मंडळी एकत्र आल्यावर त्यांच्या क्रिया, प्रतिक्रिया, प्रतिक्षिप्त क्रियांतून हे धमाल विनोदी नाटक बेफामपणे आकारास येतं.
लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी हे प्रहसन छान जुळवलं आहे. चित्रविचित्र पात्रं आणि त्यांच्या एकत्र येण्यातून हे इरसाल नाटक फुलत गेलं आहे. पहिल्या अंकात यातल्या पात्रांची ओळख परेड होते. त्यांचे एकेक कारनामे आणि त्यांचे स्वभाव, लकबी, वृत्ती-प्रवृत्ती नाटकाचा परिस्थितीजन्य प्रवास घडवीत जातात. लेखकानं सगळ्या प्रकारच्या विनोदांची भरमार नाटकात केलेली आहे. शाब्दिक विनोदांपासून पीजे, उपरोधिक, उपहासिक, अतिशयोक्तीपूर्ण विनोद अशा सगळ्याची पखरण नाटकात प्रसंगानुरूप होते. तीही अचूक टायमिंगने. वर्तमानातील राजकीय घटना-घडामोडींवरील विनोदही त्यात प्रसंगोपात येतात आणि प्रेक्षकांना हसवून बेजार करतात. नाटकातील विनोदाचा दर्जा आणि समज यात लेखकाची हुकुमत दिसून येते. त्यांनी कुठंही अश्लीलतेचा, कमरेखालच्या विनोदाचा इथे आधार घेतलेला नाही. सगळ्या पात्रांची स्व-भाववैशिष्टय़े त्यांनी निश्चित केली आहेत आणि त्याबरहुकूम त्यांच्याकडून कामं करवून घेतली आहेत. ओढूनताणून विनोदाची गरज दिग्दर्शकाला कुठंच पडलेली नाही. प्रसंगनिष्ठ विनोद हे या नाटकाचं मोठंच वैशिष्टय़. त्यात लेखक-दिग्दर्शक कुठंही कमी पडत नाही. म्हटलं तर फारसं कथानक नसलेलं हे नाटक इम्प्रोव्हाइझ तंत्रानं त्यांनी खुलवलं, फुलवलं आहे. अलीकडच्या काळात संतोष पवार यांच्यानंतर या तंत्रानं नाटक बसवणं फारसं कुणाला साधलेलं नाही.

अंकुश कांबळी यांनी पूर्वीच्या काळच्या सांकेतिक रंगवलेल्या पडद्यांच्या तसेच वास्तवदर्शी नेपथ्याने नाटकाची मागणी पुरवली आहे. शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेतून नाटकातलं नाटय़ गडद, ठळक केलं आहे. आदित्य आणि अनिरुद्ध शिंदे यांचं पार्श्वसंगीत, उमेश जाधव आणि कुंदन अहिरे यांची नृत्यरचना यांनी नाटकात बहार आणली आहे. अशोक राऊत यांची रंगभूषा आणि लक्ष्मण गोल्हार यांची वेशभूषा पात्रांना भूमिकाबरहुकूम ‘चेहरा’ देणारी आहे.

भाऊ कदम या हरहुन्नरी अभिनेत्याने सरपंचाच्या भूमिकेत जोरदार बॅटिंग केली आहे. त्यांचं विनोदाचं टायिमग, अचूक संवादफेक आणि मिश्कील देहबोलीतून त्यांनी इरसालपणाचा नमुना पेश केला आहे. ओंकार भोजने यांनीही मास्तरांच्या भूमिकेत अस्सल मालवणी तडका दिला आहे. दुसऱ्या अंकात त्यांनी साकारलेलं स्त्रीपात्र आणि त्यात केलेला नाच त्यांच्या अष्टपैलुत्वाचा वानवळा दर्शवणारा आहे. संवादांवरील हुकूमत हे त्यांचं आणखी एक अस्त्र. ते त्यांनी पुरेपूर वापरलं आहे. अनुष्का बोऱ्हाडे यांनी बिजलीची लय, तालाची जाण दाखवत आवश्यक त्या मादकतेनं ती पेश केली आहे. खाष्ट काकूच्या भूमिकेत उषा साटम या चपखल बसल्या आहेत. प्रणव जोशी यांनी ‘पहुंचा हुआ’ आमदार नाना मतकर पुरेशा बेरकीपणानं उभा केला आहे. सचिन शिंदे (धृतराष्ट्र), नुपूर दुदवडकर (आगरी अमर), सौरभ गुजले (बोंडक्या), सुमित सावंत (सलमान), दीपक लांजेकर (शांत्या), कैलास कणकेकर (आमदाराचा बॉडीगार्ड) यांनी आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.

‘करून गेलो गाव’मध्ये बऱ्याच दिवसांनी एक खऱ्या अर्थानं धम्माल विनोदी धुमशान पाहायला मिळाल्याचं सुख प्रेक्षकांना मिळतं. चार घटका मनोरंजन हवं असणाऱ्यांना तर ही पर्वणीच आहे.