अनेकदा आपण एखाद्या परिस्थितीतून सहज बाहेर पडू किंवा तसा यशस्वी प्रयत्न तरी करु असे वाटते. पण आयुष्यात अशाही काही घटनांना अचानकपणे सामोरे जावे लागते, ज्यासाठी आपली तयारी नसते. अभिनेत्री हेमांगी कवीच्या बाबतीतही असेच काहीसे झाले. ती फुलराणी नाटकाच्या ऐनप्रयोगामध्येच असे काही घडले जी ते आयुष्यभर विसरु शकत नाही.
‘ती फुलराणी’सारखं नाटक करणं हेच माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. त्याचा पहिला प्रयोग डोंबिवलीला होता. पहिल्या प्रयोगाला मी खूप उत्साही होते. मनात भीती होती पण तरीही फार भारी वाटत होतं. याआधी मी सहा नाटकं केली. पण त्या नाटकांच्यावेळी मला आपल्या खांद्यावर एक जवाबदारी आहे आणि मला ते करुन दाखवायचं आहे अशी भावना कधी मनात नव्हती. पण ती फुलराणीच्या पहिल्या प्रयोगाला मला खूप वेगळंच वाटत होते. ते मी शब्दांत मांडू शकत नाही. या नाटकाबद्दलची अजून एक न विसरणारी गोष्ट म्हणजे माझे बाबा पहिल्यांदा हे नाटक पाहायला गावावरुन आले होते. मुलीचा ती फुलराणीचा पहिला प्रयोग त्यांना काही करुन बघायचा होता. त्यामुळेही असेल कदाचित ते वातावरण मला उत्साहं आणि दडपण असं दोन्ही देत होतं.
नंतर माझे बाबा गेले त्याच्या चौथ्या दिवशी माझा प्रयोग होता. चार दिवस मी स्वतःला समजावत होते की याचा परिणाम कामावर होऊ द्यायचा नाही. त्यातही इंडस्ट्रीच्या नियमाप्रमाणे काहीही झाले तरी शो मस्ट गो ऑन. अर्धा प्रयोग नीट झालाही पण नंतर नाटकामध्ये एक कविता सुरु होते. त्यावेळी विजय पटवर्धन यांनी डोक्यावर हात ठेवला तेव्हा मला जे रडू फुटलं ते थांबतच नव्हतं. मी आणि विजय पटवर्धन दोघंही रडत होतो. प्रेक्षकांनाही ते कळत होतं की हे जरुरीपेक्षा जास्त रडत आहेत. पण माझ्या हातात काहीच नव्हतं. विजय पटवर्धन यांनी मला उभं केलं आणि मला धीर दिला. मी नंतर विंगेच्या बाजूला उभे असते तेव्हा मी पाहिलं की विंगेतला प्रत्येक माणूस माझ्यासाठी रडत होता. माझ्या भावना बहुधा सगळ्यांनाच कळल्या असतील, हा क्षण मी कधीच विसरु शकत नाही. आजही तो क्षण आठवला की माझ्या अंगावर काटा येतो.
शब्दांकन – मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@indianexpress.com