मराठी रंगभूमीवर लवकरच एक नवीन नाटक येत असल्याची जाहिरात आपण नेहमीच वृत्तपत्रांमधून वाचतो. कलाकारांचे जेवढं नाटकांवर प्रेम असते, तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रेम रसिक प्रेक्षकांचे असते. त्यामुळेच कितीही सिनेमे, मालिकांमध्ये काम केले तरी रंगभूमीवर परतण्याची प्रत्येकाची इच्छा असते. याला अभिनेत्री तेजश्री प्रधानही अपवाद नाही.
मुळात नाटक करण्याचा माझा अनुभव खूप छान होता. हिंदी आणि मराठी या दोन्ही रंगमंचांवर एकाचवेळी नाटक करायला मिळणं, ही फार भाग्याची गोष्ट. प्रशांत दामले आणि शर्मन जोशी हे दोघंही हिंदी आणि मराठी रंगमंचावरचे सुपरस्टारच. त्यांच्या नावामुळेच थिएटरमध्ये येणारा प्रेक्षक बघणे हाही एक वेगळा अनुभव होता. त्यांना आपल्या सोबत अभिनय करताना पाहणे आणि त्याचवेळी चाहत्यांचे त्यांच्यावरील प्रेम बघायला मिळणे हा खरंतर दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.
आयुष्यातलं पहिलं नाटक अशा कलाकारांसोबत करायला मिळणं हेच माझ्यासाठी खूप आहे. या एका गोष्टीची सर इतर कशालाच येणार नाही. प्रशांत दादा आणि शर्मन जोशी यांनी मला फोन करून त्यांच्यासोबत नाटकात काम करण्याबद्दल विचारल्याचा दिवस मी कधीच विसरु शकत नाही. कधी कधी आनंद अनपेक्षितपणे आपल्यासमोर येतो, याचा अनुभव मी तेव्हा घेतला. ही माझ्यासाठी एक स्वप्नपूर्तीच होती.
पूर्वीच्या ईटीव्हीवर (सध्याचे कलर्स मराठी) मी ‘लेक लाडकी या घरची’ मालिका करत होते, तेव्हाही मी नाटकासाठी वेळ देत होते.
एकदा आपण प्रसिद्ध झालो की आपली इतर कामंही प्रसिद्धीच्या झोतात येतात. जान्हवी या व्यक्तिरेखेने मला प्रसिद्धी मिळाल्यावर त्याचा रंगभूमीवरही फायदा झाला. माझ्या नाटकांना प्रेक्षकांची गर्दी होऊ लागली. सध्या मी जरी मालिका करत असले, तरीही जसं शक्य होईल तसं शेवटपर्यंत नाटकात काम करत राहण्याचं मी मनोमनी ठरवलंय. कारण नाटक एक असा अनुभव आहे जो प्रत्येकाला प्रगल्भ बनवतो. रंगभूमी तुम्हाला सतत शिकवत असते. शिवाय अभिनयात तोच तोचपणा येऊ नये, यासाठी नाटक केलेच पाहिजे, असे मला वाटते. आजच्या पिढीसाठी, आजच्या विषयांवर आधारित एक नवीन नाटक करायला मला नक्कीच आवडेल.
शब्दांकन- मधुरा नेरुरकर