‘तमाशा’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले तेव्हापासूनच अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचे प्रेमाने बांधलेले घरटे कुरबुरींनी भरू लागले असल्याची चर्चा होती. खुद्द कतरिनाने आपल्या उलटसुलट प्रतिक्रियांनी त्याला जास्त हवा दिली. हे सगळे कमी होते म्हणून की काय, अभिनेता ऋषीकपूर यांनीही काय हिंमत कतरिनाची, ती मला ‘पप्पा’ म्हणून हाक मारेल, असे सांगत त्यांच्या लेखी तिचे स्थान स्पष्ट केले आहे.

ऋषी कपूर नेहमीच आपल्या फटकळ विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. अगदी त्यांच्या मुलाच्या रणबीरच्या कारकीर्दीबद्दलही फार बोलणे त्यांना पसंत नाही. त्यांचे आणि रणबीरचे नाते कित्येक वर्षे बिघडलेले होते, याचीही स्पष्ट कबुली त्यांनी दिली होती. एवढेच नाही, तर रणबीर प्रेमाबाबत गंभीर नाही, हेही त्यांनी कित्येकदा सांगितले होते, मात्र गेल्या काही दिवसांत विशेषत: रणबीरने कतरिनाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास सुरुवात केल्यानंतरही चिंटू ‘कपूर’ फॅ मिली आनंदात आहे, असे एक चित्र उगीच निर्माण झाले होते. मध्यंतरी ऋषी क पूर आजारी होते त्या वेळीही सुनेच्या भूमिकेतून कतरिनाने त्यांची सेवा केल्याचे बोलले जात होते. मात्र, ‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’ या म्हणीप्रमाणे कपूर घरटय़ातील प्रत्येक गोष्ट कतरिनाच्या बाबतीत उलटी फिरू लागली आहे. ‘तमाशा’ चित्रपटाच्या दरम्यान दीपिका आणि रणबीरच्या सतत एकत्र येण्याने वैतागलेल्या कतरिनाने कधी नव्हे ते आपले ताळतंत्र सोडून माध्यमांसमोर याबद्दलची अस्वस्थता प्रकट केली. त्यामुळे या दोघांचे नाते चांगलेच बिनसले असल्यावर जणू शिक्कामोर्तब झाले आहे. याच गोष्टीवरून एका मुलाखतीदरम्यान ऋषी कपूर यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा रणबीरच्या खासगी जीवनाबद्दल आपल्याला सतत का विचारणा केली जाते, असा उलट प्रश्न त्यांनी केला. मात्र एवढेच बोलून ते थांबले नाही. कतरिनाबद्दल आपली काहीच तक्रार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझ्या मते कतरिना खूप चांगली, नेहमी सगळ्यांशी नीट वागणारी आणि अतिशय मेहनती आहे, अशा शब्दांत ऋषी कपूर यांनी तिची प्रशंसा केली, पण म्हणून कतरिनाचे त्यांच्या मनात फार चांगले स्थान आहे, असा निष्कर्ष चुकीचा असल्याचे त्यांच्या पुढच्या विधानातून स्पष्ट जाणवूनही दिले. मध्यंतरी एका वर्तमानपत्राने कतरिना आपल्याला ‘पप्पा’ संबोधायला सुरुवात केल्याचे वृत्त होते. तिची हिंमत, ती मला ‘पप्पा’ म्हणेल.. काहीही झाले तरी माझ्याबाबतीत असे काही स्वातंत्र्य घेण्याची हिंमत ती करणार नाही, अशा शब्दांत सगळ्याच प्रकरणाची त्यांनी चिरफाड केली.