स्पेनमध्ये घालवलेल्या सुट्टीची छायाचित्रे आणि त्यावरून उठलेला चर्चेचा धुरळा आता कुठे खाली बसतोय न बसतोय तोवर रणबीर आणि कतरिनाने पुन्हा एकत्र सुट्टीचे आयोजन केले आणि ते गुप्तपणे अमलातही आणले आहे. बॉलिवूडची ही प्रसिध्द जोडगोळी पडद्यावर आणि पडद्याबाहेरही पुन्हा एकत्र आली आहे. ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटानंतर रणबीर आणि कतरिना ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. ही झाली पडद्यावरची गोष्ट तर पडद्याबाहेरही ते दोघे एकत्र आले आहेत ते श्रीलंकेत. सध्या अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटाचे चित्रीकरण श्रीलंकेत सुरू आहे. कतरिनाही तिथे रणबीर आणि अनुष्का शर्माबरोबर सुट्टी घालवण्यासाठी पोहोचली, मात्र या भेटीगाठीबाबत गुप्तता पाळण्यात आली…रणबीर-कतरिना वारंवार एकत्र दिसत असल्याने त्यांच्या प्रेमाची चर्चा रंगत आहे. प्रत्यक्षात ते दोघेही आपण प्रेमात असल्याचे कबूल करायला तयार नसल्यानेच माध्यमे त्यांच्यामागे हात धुवून लागली आहेत. त्याचीच परिणती स्पेनमधील त्यांच्या सुट्टीची छायाचित्रे प्रदर्शित करण्यात झाली. मात्र, कतरिनाने सर्व वृत्तपत्रांकडे पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली. रणबीरने मात्र आपण त्या गावचेच नाही, अशापध्दतीने मौन बाळगले. तरीही त्यांच्या एकत्र येण्यात खंड पडलेला नाही. फक्त अशी छायाचित्रे प्रसिध्द झाली तर समकालीन कलाकारांच्या तुलनेत आपली पत घसरेल, या भितीने या दोघांनी कमालीची गुप्तता पाळण्याचे ठरविल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते.
श्रीलंकेतील कतरिनाची सुट्टी आणि रणबीरचे चित्रीकरण संपल्यानंतर ते दोघेही अनुराग बसूचे दिग्दर्शन असलेल्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी कतरिनाला विचारणा करण्यात आली आहे. तर हा चित्रपट अनुराग बसू आणि रणबीरची संयुक्त निर्मिती असल्याने नायक म्हणून त्याचे नाव निश्चित झाले आहे. अर्थात, या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्यासाठी पुढचे वर्ष उजाडणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा