‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटानंतर अभिनेता विकी कौशल प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. आगामी चित्रपटांसोबतच विकीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. गेल्या काही दिवसांपासून विकी आणि हरलीन सेठीच्या अफेअर आणि त्यानंतर ब्रेकअपचीही जोरदार चर्चा आहे. तर कतरिना कैफ आणि विकीमध्ये काहीतरी शिजत असल्याचेही म्हटले जात आहे. आता कतरिना आणि विकी एका चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा सुरु झाल्या होत्या. परंतु आता ते काम करणार की नाही याचा खुलासा झाला आहे.
दिग्दर्शक रोनी स्क्रूवाला हे एक रोमॅन्टिक चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तसेच या चित्रपटात विकी कौशल आणि कतरिना कैफ हे दोघे मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु मीड-डेने दिलेल्या वृत्तानुसार दोन्ही कलाकारांनी अद्याप चित्रपट साईन केलेला नाही. चाहते कतरिना आणि विकीला एकत्र पाहण्यासाठी फार उत्सुक होते. परंतु आता या सर्व अफवा असल्याचे सुत्रांनुसार समोर आले आहे.
‘कॉफी विथ करण’ या रिअॅलिटी शोमध्ये जेव्हा विकीला त्याच्या रिलेशनशिप स्टेटस विचारले होते, तेव्हा त्याच्या आयुष्यात कोणीतरी असल्याचे त्याने अप्रत्यक्षरित्या सांगितले होते. हरलीन आणि विकीचे काही फोटोसुद्धा त्यादरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण कतरिनामुळे या दोघांमध्ये दुरावा आल्याचे म्हटले जात आहे. हरलीनने विकीला इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्यामुळे या चर्चांना सुरूवात झाली होती.
विकी कौशलच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, तो सध्या उधम सिंग चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटातील उधम सिंगची व्यक्तिरेखा पहिल्यांदा इरफान खान साकारणार होता. पण इरफानने आजारपणामुळे हा चित्रपट करण्यास नकार दिला. त्यामुळे या भूमिकेसाठी विकीची निवड करण्यात आली. दुसरीकडे कतरिना ‘भारत’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.